Tue, Jul 16, 2019 12:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपलाही एक्स्पायरी डेट आहे: राज ठाकरे

भाजपलाही एक्स्पायरी डेट आहे: राज ठाकरे

Published On: May 05 2018 10:12AM | Last Updated: May 05 2018 10:12AMअंबरनाथ: प्रतिनिधी

छगन भुजबळ जर दोषी असतील तर त्यांना शिक्षा होईलच. मात्र त्यांना जामीन मंजूर होण्यासाठी जो उशीर लागला, तो भाजपा सरकारमुळेच. आता भाजपच्या फायद्यासाठी त्यांना जेलच्या बाहेर काढणार असतील तर हे राजकारण चांगले नाही. तेही जनतेला कळेलच. त्यामुळे भाजपलाही एक्स्पायरी डेट आहे, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ येथे दिली. 1 मेपासून महाराष्ट्र दौर्‍यावर निघालेल्या राज यांनी शुक्रवारी अंबरनाथ शहरातील मान्यवर नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

नागरिकांनी राज यांच्यासमोर गणेश विसर्जनासाठी गणेशघाट बांधण्याची गरज आहे, एमआयडीसीतील ठेका पद्धतीवर काम करणार्‍या कामगारांचा प्रश्‍न, मुंबई विद्यापीठातील रखडलेले निकाल, फेरीवाले असे विविध प्रश्‍न मांडले. मात्र मीच किती आंदोलने करायची. त्यासाठी माझ्या हातात सत्ता द्या, जे काम करीत नाहीत त्यांना निवडणुकीत मतदान करू नका, असेही राज यांनी सांगितले. फेरीवाल्यांचा प्रश्‍न इतर कोणत्याही पक्षाने घेतला नाही. मात्र आंदोलने फक्त मनसेनेच करावीत का? नागरिकांनीही केवळ व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठिंबा देऊ नये. प्रत्यक्षातही नागरिकांनी रस्त्यावर उतरायला हवे. फेरीवाल्यांचा प्रश्‍न अंबरनाथमध्ये मार्गी लागत नसेल तर येथील मुख्याधिकारी आणि पालिकेविरोधात कोर्टात केस टाका, असा आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली

बदलापूर/उल्हासनगर/मुरबाड : वार्ताहर

बदलापूरच नव्हे तर संपूर्ण राज्यातच पक्ष संघटना बांधणीकडे गेल्या काही वर्षांत आपले दुर्लक्ष झाल्याची प्रांजळ कबुली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. आता प्राधान्याने पक्ष संघटना मजबूत करणार आहे आणि मग संघटनेच्या माध्यमातून सर्व शहरांतील समस्या सोडविणार असल्याचेही राज यांनी बदलापुरात बोलताना सांगितले. संपूर्ण देशात स्थलांतरित नागरिकांची संख्या ही महाराष्ट्रात जास्त आहे. त्यातही महाराष्ट्रातील वाढती लोकसंख्या केवळ ठाणे जिल्ह्यात असल्याचे सांगून राज यांनी पुन्हा परप्रांतीयांच्या मुद्द्याला हात घातला. मनसेला येत्या निवडणुकीत एक हाती सत्ता द्या. या सर्व समस्या कायमस्वरूपी सोडवू, असा दावाही राज यांनी केला.