Tue, Jun 18, 2019 22:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भुरळ घालून लुटणार्‍या भोंदूबाबांंची धुलाई

भुरळ घालून लुटणार्‍या भोंदूबाबांंची धुलाई

Published On: Jan 09 2018 2:02AM | Last Updated: Jan 09 2018 1:51AM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात कामात व्यस्त असलेल्या नागरिकांना लक्ष्य करत त्यांना भुरळ घालत बेशुद्ध करून लुटण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. असाच एक प्रकार सोमवारी 12.30 च्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील वर्दळीच्या आरटीओ परिसरात घडला. एका आरटीओ एजंटला भुरळ घालत त्याला लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार भोंदू बाबांना संतप्त नागरिकांनी यथेच्छ झोडपून पोलिसांच्या ताब्यात दिले. मोकनाथ राजेस्थानी, धनानाथ कालबेलीया, किसननाथ कानुनाथ आणि विजयनाथ कालबेलीया अशी गजाआड झालेल्या भोंदू बाबांची नावे आहेत. बेदम मारहाण झाल्याने खडकपाडा पोलिसांनी या चौघाही भोंदूंना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर तपासानंतर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कल्याण पश्चिमेकडील आरटीओ परिसरात राहणारा रोहन बाबडे हा आरटीओ एजंट म्हणून काम करतो. सोमवारी सकाळी अकरा ते साडेबाराच्या सुमारास रोहन हा आरटीओ कार्यालयात आपले काम करत बसला होता. इतक्यात भगवी वस्त्रे व सर्वांगाला अंगारा फासलेले 4 साधू त्याच्याकडे आले. या साधूंनी बोलता बोलता रोहनला भुरळ घातली. त्यामुळे रोहन बेशुद्ध पडला. तोल गेल्याने बसल्या जागी तो कोसळला. या बाबांनी त्याच्याकडील सामान हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आवाज झाल्याने आसपासच्या नागरिकांना संशय आला. त्यांनी रोहनकडे धाव घेतली. रोहनच्या बाबतीत घडलेला प्रकार लक्षात आला. हे बाबा पळून जाण्याच्या बेतात असताना नागरिकांना त्यांना पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर या लुटारू बाबांना खडकपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मारहाणीत जखमी झालेल्या चारही भोंदू बाबांना उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.