Sun, Nov 18, 2018 09:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दीड वर्षांच्या मुलाची आईकडूनच हत्या

दीड वर्षांच्या मुलाची आईकडूनच हत्या

Published On: Jan 31 2018 8:32PM | Last Updated: Jan 31 2018 8:45PMभिवंडी : प्रतिनिधी

भिवंडी तालुक्यातील मानकोली परिसरात राहणाऱ्या एका महिलेने प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या मुलाची हत्या करून मृतदेह खाडीकिनारी गाडून ठेवल्‍याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नारपोली पोलिस स्टेशन हद्दीतील दापोडा ग्रामपंचायत परिसरातील इंडियन कार्पोरेशन या गोदामात संकुलाच्या जवळच्या चाळीत ही घटना घडली असून, आर्यन विरेंद्रकुमार यादव (वय १४ महिने) असे हत्या झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याची जन्मदाती आई ममता हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिचा प्रियकर फरार झाला आहे.

विरेंद्रकुमार यादव याचा तीन वर्षांपूर्वी ममता सोबत प्रेमविवाह झाल्यानंतर ते दोघे दापोडा येथील इंडियन कार्पोरेशन गोदामात संकुलातील चाळीत रहात होते. ममताने आर्यनला जन्म दिला. दरम्यान ममताचे याच परिसरात राहणा-या राकेश पटेल सोबत प्रेमसंबंध जुळल्याने नोव्हेंबर महिन्यात ममता ही आपले मुल आर्यनसोबत प्रियकरासह पळून गेली व त्याच परिसरात राहावयास आली.

आज सकाळ पासून आर्यन दिसत नसल्याने पिता विरेंद्रकुमार याने आपली पहिली पत्नी ममताकडे चौकशी केली असता ती उडवाउडवीची उत्तरे द्यायला लागली. विरेंद्रकुमारचा संशय बळावल्याने त्याने नारपोली पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. पोलिसांनी ममताच्या घरी येऊन पोलिसी खाक्या दाखवत तपासणी केली असता ममताने प्रियकर राकेश पटेलच्या मदतीने आपल्या चिमुकल्या आर्यनची हत्या गळा दाबून करून मृतदेह लगतच्या खाडी किनारी रात्रीच्या अंधारात गाडून ठेवल्याचे कबूल केले.

पोलिसांनी तातडीने खाडी किनारी जाऊन पोलिसांनी मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला. आई ममता हिला नारपोली पोलीसांनी हत्येच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. प्रियकर  राकेश पटेल फरार असून, त्याचा शोध नारपोली पोलिस घेत आहेत.