Tue, Apr 23, 2019 23:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीतील अनधिकृत गोदामावर कारवाईचे आदेश : रणजीत पाटील

भिवंडीतील अनधिकृत गोदामावर कारवाईचे आदेश : रणजीत पाटील

Published On: Jul 20 2018 6:17PM | Last Updated: Jul 20 2018 6:17PMनवी मुंबई  : प्रतिनिधी 

भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात उभारलेल्या अनधिकृत गोदामांबाबत आजच सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन अनधिकृत ठिकाणची वीज व पाणी तोडण्याची कारवाई करु, असे नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या वेळी बोलताना सांगितले.

विधान सभा सदस्य सुनील केदार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले, भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 45 अन्वये इमारत बांधकामासाठी विकास परवानगी दिली जाते. तथापि, प्राधिकरणातर्फे या इमारतीमधील कोणत्याही प्रकारच्या रासायनिक साठ्यासाठी वापर परवानगी दिली जात नाही.

भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रातील अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सर्व अनाधिकृत बांधकामाप्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 अन्वये निर्गमित केलेल्या नोटीस विषयी सदर अनाधिकृत बांधकाम हे शासनाच्या 2017 च्या धोरणानुसार नियमित होते किंवा कसे याची प्रथमत: पडताळणी केल्यानंतरच अंतिम निष्कासनाची कार्यवाही करण्याचे नियोजित आहे. अनाधिकृत गोदामासंदर्भात शासनाच्या संबंधित विभागास पोलिस संरक्षण दिले जाईल व तातडीने कार्यवाही केली जाईल, असेही डॉ. पाटील यांनी यावेळी विचारलेल्या उपप्रश्नानाला उत्तर देताना सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री सुनील केदार, जितेंद्र आव्हाड यांनी सहभाग घेतला.

मुंबई मनपा शाळेसाठी आरक्षित भूखंड व अतिक्रमण संबंधितांविरुद्ध तातडीने कार्यवाह

 मुंबई मनपा प्रभाग क्र. 86 मधील एका शाळेच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमण करुन बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात 352 ची नोटीस व यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या वेळी बोलताना सांगितले.
सदस्य सुधाकर देशमुख यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी उत्तर देताना डॉ. पाटील यांनी सांगितले, या बांधकामाबाबत  31 मार्च रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 11 एप्रिल व दि. 3 मे रोजी पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान या बांधकामाच्या समोर व्हरांड्यात बांधकाम आढळल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई मनपा अधिनियम 1888 च्या कलम 351 अन्वये  5 मे रोजी सद्य:स्थितीत मालक असणाऱ्या अभिषेक विनोद जैन यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याअनुषंगाने जैन यांनी  27 जून रोजी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. तपासणीअंती नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई मनपामार्फत कळविण्यात आले आहे.

मुंबई मनपाने चितळे समितीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करण्यास सूचना

मुंबईमध्ये दरवर्षी सरासरी 2 हजार 400 मिमी इतक्या पावसाची नोंद होते. पावसाळ्यात ताशी 50 मिमी पर्यंत पाऊस पडल्यास निचरा होण्याकरिता पर्जन्य जलवाहिन्या सक्षम आहेत. तथापि, 26 जुलैनंतर नेमलेल्या चितळे समितीने केलेल्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी, अशा सूचना मुंबई महानगरपालिकेस देण्यात येतील, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या वेळी बोलताना सांगितले.

सदस्य ॲड. पराग अळवणी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले, मुंबईत पावसामुळे साचलेल्या पाण्याचा जलद गतीने निचरा करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 300 पर्जन्य जल उदंचन संच तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे मार्गावरील पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी सायन व माटुंगा येथे ताशी 1000 घन मिटर क्षमतेच्या दोन उचंदन संचांची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावर्षी झालेल्या नालेसफाईमुळे व नाले रुंदीकरणाच्या कामामुळे नाल्यांमधून वाहून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच लव्हग्रोव्ह व इर्ला उदंचन केंद्रामध्ये प्रथमच वापरण्यात आलेल्या ट्रॅश ब्रुममुळे मोठ्या प्रमाणात वाहून येणारा कचरा अडविला जातो आहे. तसेच ब्रिम्सस्टोवॅड प्रकल्पांतर्गत गेल्या आठ वर्षात हाजिअली, इर्ला, लवग्रुव्ह, क्लीवलँड व बिटानिया अशी एकूण 5 पर्जन्य उदंचन केंद्रे कार्यान्वित झालेली असून ते पूर्ण क्षमतेने चालू आहेत. या 5 पर्जन्य उदंचन केंद्रांमधून 2018 च्या पावसाळ्यात दि. 18 जुलै पर्यंत 33 हजार 571 दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करुन पाणी समुद्रात सोडण्यात आलेले आहे. मनपास टास्क फोर्स तसेच समयबद्ध कार्यक्रम राबविण्याबाबतही सूचना देण्यात येतील, असेही डॉ. पाटील यांनी उपस्थित उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

सदस्य आशिष शेलार, योगेश सागर, कालिदास कोळंबकर यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.