Thu, Aug 22, 2019 08:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भारत बंदला कल्याण - डोंबिवलीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

भारत बंदला कल्याण - डोंबिवलीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: Sep 10 2018 6:06PM | Last Updated: Sep 10 2018 6:06PMटिटवाळा : प्रतिनिधी 

इंधन दरवाढीविरोधात ‘भारत बंद’ला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .  सकाळी १०  वाजल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसेतर्फे कल्याण परिसरात बंदचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर दुकानदारांनी स्वतःहूनच या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश मुथा यांच्या नेतृत्त्वाखाली शिवाजी महाराज चौकात काँग्रेस  आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने केली.  तर काही वेळासाठी शिवाजी महाराज चौकात ठिय्या मांडत रास्ता रोको देखील करण्यात आले.  

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकातून मोर्चाची सुरुवात करत बैलगाडी, टांगे व दुचाकीस्वार यांसह बैल बाजार मार्गे मोहल्ला परिसरात जात पुन्हा शिवाजी चौक मार्गे आग्रा रोड, दुर्गाडी, आधारवाडी, खडकपाडा, बिर्ला कॉलेज, प्रेम ऑटो, सुभाष चौक मार्गे स्टेशन परिसरात तहसीलदार कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला.  

यावेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रिक्षा युनियन, व्यापारी असोसिएशन, ज्वेलर्स असोसिएशन आदींच्या शिष्ट मंडळाने तहसीलदार अमित सानप यांची भेट घेत त्यांना इंधनदरवाढ कमी करण्याबाबतचे निवेदन सादर केले.

मोदी सरकारनी दिलेली आश्वासनं ही फोल ठरली असून त्यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता त्यांनी सत्तेत आल्यानंतर केलेली नसून, दरदिवशी इंधनाची दरवाढ होत आहे. यामुळे सर्व सामन्यांनाचे कंबरडे मोडले आहे.  याच्या निषेधार्थ आम्ही कल्याण बंद ठेवण्याचा निर्णय  सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत घेतला असून या बंदला कल्याणकर नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश मुथा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

डोंबिवली शहरात झालेल्या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय कम्युनीट पक्ष ( माक्सर्वादी ), बहुजन समाज पार्टी यांनी जोरदार निदर्शने केली. मनसेने बैलगाडीतून मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध केला. तर बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी हे सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेची भाजप सरकार पायमल्ली करत आहे असे यावेळी सांगितले. पुकारलेल्या  बंदला डोंबिवलीत उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मनसेचे बैलगाडी आंदोलन 

या परिसरातील रिक्षा आणि दुकाने सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  पदाधिकारी आणि  कार्यकर्ते यांसह बैलगाडीतून मोर्चा काढून निषेध केला.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी समीर भोईर आणि पूजा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे सरकार फसवे असल्याचे सांगत निदर्शने केली. या बंद मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व इतर  पक्षांनी सहभाग घेतला. परंतू भाजपा सरकारचा मित्र पक्ष शिवसेना मात्र या बंद पासून दुर राहीला. यामुळे महाराष्ट्रात या बंदला काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद दिसून आला. कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागासह टिटवाळा शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला. काही ठिकाणी दुकाने बंद होती तर काही ठिकाणी सुरू. रिक्षा वाहतूक देखील काही प्रमाणात सुरू होती. तसेच येथील शाळा कॉलेजेस देखील सुरळीत सुरू होते. रस्त्यावरील वाहनाची वाहतुक देखील रोजच्या प्रमाणात दिसून येत होती.