Tue, May 21, 2019 12:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्री भराडीदेवी यात्रेनिमित्त भक्‍तांचा महापूर

श्री भराडीदेवी यात्रेनिमित्त भक्‍तांचा महापूर

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 28 2018 1:05AMश्री क्षेत्र आंगणेवाडी : संतोष अपराज

कोकणातील प्रसिद्ध दैवत आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.  ‘आई भराडी देवी नमो नम:’ च्या जयघोषात शनिवारी आंगणेवाडीनगरी भक्‍तिरसात न्हाऊन निघाली. भाविकांनी आई भराडीचे दर्शन घेत नवस फेडले. मध्यरात्री तीन वाजल्यापासून देवीचे दर्शन आणि ओट्या भरण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. भाविकांच्या आगमनाने संपूर्ण आंगणेवाडी परिसर भक्‍तिमय बनला आहे.

शनिवारी दिवसभरात शिवसेना, भाजप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकारी, सिने-कलावंत यांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. रात्री उशिरा भाविकांच्या गर्दीने आंगणेवाडी परिसर बहरून गेल्याचे चित्र होते. 

यावर्षी प्रथमच आंगणेवाडीत कृषी महोत्सव तसेच सिंधु सरस प्रदर्शन भरविण्यात आल्याने शुक्रवारपासूनच  भाविक आंगणेवाडीत दाखल होत होते. रात्री तीन वाजल्यापासून देवीच्या ओटी तसेच नवस बोलणे, फेडणेच्या कार्यक्रमास सुरुवात होणार असल्याने राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. देवीच्या दर्शनासाठी उभारण्यात आलेल्या पुलांवर भाविकांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र मध्यरात्री पाहावयास मिळाले. यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर भराडी देवीस भरजरी साडी तसेच सुवर्णालंकारानी सजविण्यात आले होते. भाविकांना देवीचे दर्शन चांगल्यारितीने व्हावे यासाठी नऊ रांगांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. अपंग तसेच अतिमहनीय व्यक्‍तींसाठी स्वतंत्र रांग होती. त्यामुळे भाविकांना देवीचे तत्काळ दर्शन घेता येत होते. 

पहाटे अनेक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. ज्यांना केवळ देवीचे मुखदर्शन घ्यायचे होते अशा भाविकांसाठी आवश्यक सुविधा ग्रामस्थ मंडळाने उपलब्ध करून दिली होती. 

ज्येष्ठ नेते नारायण राणे, नीलम राणे,  शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, आ. नितेश राणे, आ. रवींद्र फाटक, खा. श्रीकांत शिंदे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आ. शिवराम दळवी, देवदत्त सामंत, अशोक सावंत आदी मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतले.