Sun, May 26, 2019 00:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्यापासून बेस्ट प्रवास महाग!

उद्यापासून बेस्ट प्रवास महाग!

Published On: Apr 11 2018 1:49AM | Last Updated: Apr 11 2018 1:48AMमुंबई : राजेश सावंत

बेस्टच्या 1 ते 12 रुपये भाडेवाढीला बेस्ट समितीसह मुंबई महापालिका सभागृहाने मंजुरी दिली. हा प्रस्ताव सध्या मुंबई मेट्रो विभागीय वाहतूक प्राधिकरण (एमएमआरटीए)  यांच्याकडे सादर करण्यात आला असून यावर बुधवारी होणार्‍या बैठकीत निर्णय होणार आहे. त्यामुळे गुरुवार 12 एप्रिल सकाळपासून मुंबईकरांना बेस्टच्या भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे. 

बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. त्यामुळे बेस्टने कामगारांचे भत्ते गोठवण्यासह मुंबईकरांवर भाडेवाढ लादण्याचा निर्णय घेतला आहे. या भाडेवाढीला बेस्ट समिती व मुंबई महापलिकेने अंतिम मंजुरी दिल्यामुळे या भाडेवाढीची अंमलबजावणी करण्याकरिता हा प्रस्ताव परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मुंबई मेट्रो विभागीय वाहतूक प्राधिकरण (एमएमआरटीए) यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. या प्राधिकारणाची बैठक बुधवारी होणार असून या बैठकीत भाडेवाढीला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरूवार 12 एप्रिलपासून भाडेवाढ लागू करण्यात येणार असल्याचे बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. या भाडेवाढीत 5 किमीपर्यंतच्या किमान भाड्यात कोणतीही वाढ सूचवण्यात आलेली नाही. मात्र  6 किमीपासून 1 ते 12 रुपये पर्यंत भाडेवाढ होणार आहे. याचा फटका तब्बल 12 ते 15 लाख प्रवाशांना बसणार आहे.

मासिक पासातही होणार वाढ

मासिक पासातही 6 किमीपासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 6 किमी अंतराच्या मासिक पासचे भाडे 620 रुपयावरून 660 रुपये होणार आहे. तर 20 किमी अंतराच्या मासिक पासचे भाडे 1 हजार 150 वरून थेट 1 हजार 500 रुपयावर पोहचणार आहे. 

विद्यार्थ्यांचा पासही महागला

शालेय व महाविद्यालयीन बसपासातही वाढ होणार आहे. त्यामुळे इयत्ता पाचवीपर्यंत मासिक पास 200 रुपये, इयत्ता सहावी ते दहावी 250 रुपये व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मासिक पाससाठी 350 रुपये मोजावे लागणार आहेत. 

Tags : mumbai, mumbai news,  best travel, expensive, tomorrow,