होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विद्यापीठाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

मुंबई विद्यापीठाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Published On: Jan 26 2018 7:46PM | Last Updated: Jan 26 2018 7:53PMमुंबई : प्रतिनिधी 

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट महाविद्यालये आणि आदर्श शिक्षक –शिक्षिका पुरस्कार जाहीर केले. हे पुरस्कार ग्रामीण आणि शहरी विभाग या वर्गवारीतून देण्यात येतात. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठीचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार ग्रामीण भागातून दापोली अर्बन बँक सिनिअर विज्ञान महाविद्यालय दापोली आणि सोनपंत दांडेकर महाविद्यालय पालघर यांना जाहीर करण्यात आले तर शहरी भागातून मिठीबाई महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठीचा ग्रामीण भागाच्या वर्गवारीतून अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय वसई आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड यांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर करण्यात आला. शहरी भागातून  सेंट एँड्र्यूज महाविद्यालय आणि ना.ग. आचार्य आणि दा.कृ. मराठे महाविद्यालय चेंबुर यांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहिर करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे, वित्त व लेखा अधिकारी विजय तायडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिपक मुकादम, प्रा. गौतम गवळी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठीचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार ग्रामीण भागाच्या वर्गवारीतून प्रा. स्नेहलता पुजारी तात्यासाहेब आठल्ये महाविद्यालय देवरुख, शहरी भागातून रेखा जगदाळे एच.बी. बीएड महाविद्यालय वाशी यांना प्रदान करण्यात आला. तर मुंबई विद्यापीठ आदर्श शिक्षक पुरस्कार ग्रामीण भागातून डॉ. श्रीकांत चऱ्हाटे पिल्लाई एचओसी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग एण्ड टेक्नॉलॉजी रसायनी खालापूर तर शहरी विभागातून डॉ. विजय दाभोळकर गुरुनानक महाविद्यालय जीटीबी नगर मुंबई यांना प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातून गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार नरेश परदेशी, कार्यालयीन अधीक्षक कोकण ज्ञानपीठ कर्जत कॉलेज, कर्जत आणि प्रसाद गवाणकर, वरिष्ठ लिपिक रं.प. गोगटे महाविद्यालय, रत्नागिरी यांना प्रदान करण्यात आला. तर शहरी भागातून सचिन गराटे, ग्रंथालय परिचर डी.जी. रुपारेल कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय माहिम आणि ए.एस.एम. सुंदरम, अधीक्षक गुरु नानक खालसा कॉलेज माटुंगा यांना गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन करुन त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी ध्वजारोहण करुन उपस्थितांशी संवाद साधून मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषण कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांनी केले.