Sun, Nov 18, 2018 21:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मारहाणीचे शूटिंग केल्याच्या संशयावरून दोघांना बेदम मारहाण

मारहाणीचे शूटिंग केल्याच्या संशयावरून दोघांना बेदम मारहाण

Published On: Apr 12 2018 1:26AM | Last Updated: Apr 12 2018 12:57AMकल्याण : वार्ताहर

मुले चोरी करत असल्याचा संशयावरून एका मद्यधुंद तरुणाला जमाव मारहाण करीत असताना गर्दी पाहून दोन महाविद्यालयीन तरुण तेथे थांबले. याचवेळी दोघांपैकी एकाला मोबाईलवर फोन आल्याने तो तरुण फोनवर बोलत असताना हा तरुण मारहाणीचे रेकॉर्डिंग करीत असल्याचा संशयावरून या जमावाने मद्यधुंद तरुणाला सोडून या दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्‍चिमेकडील दुधनाका परिसरात बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक समाजसेवकांनी व बाजारपेठ पोलिसांनी जमावाच्या मारहाणीतून या दोघांची सुटका केल्याने पुढील अनर्थ टळला. 

दूधनाका परिसरात मद्यधुंद तरुण विनय यादव याला मुले चोरीच्या संशयावरून या परिसरातील काही लोकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान भिवंडी येथील कोनगावात राहणारे दोन महाविद्यालयीन तरुण रोशन राठोड व ऋषिकेश तायडे हे दोघे त्या परिसरातून आपल्या बाईकवरून जात असताना गर्दी पाहून येथे थांबले. यावेळी एकाला फोन आला. तो फोनवर बोलत असताना, हा तरुण मोबाईलवर शूटिंग करत असल्याचा संशय आल्याने जमावाने आपला मोर्चा या तरुणाकडे वळवून त्याला बेदम मारहाण केली. जखमी मुलांच्या तक्रारीनुसार बाजारपेठ पोलीस ठाण्यात मारहाण करणार्‍या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहेत. या दोघांना उपचारासाठी भिवंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.