Mon, Aug 19, 2019 09:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कंपनीचे बनावट धनादेश वटवल्याने बँकेला भुर्दंड

कंपनीचे बनावट धनादेश वटवल्याने बँकेला भुर्दंड

Published On: Jul 15 2018 1:39AM | Last Updated: Jul 15 2018 1:39AMमुंबई : अवधूत खराडे

कुलाब्यातील एका कंपनीचा हुबेहूब बनावट धनादेश बनवून ठगाने तो बँकेतून वठवून घेत कंपनीला लाखोंचा गंडा घातला. मात्र त्याचा भूर्दंड बँकेला बसला असून कंपनीच्या खात्यातून गेलेली रक्कम व्याजासह परत करण्याची वेळ बँकेवर ओढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन कफपरेड पोलीस आता या ठगाचा शोध घेत आहेत.

कुलाब्यातील व्यावसायिक रमेश मिरचंदानी आणि त्यांची पत्नी कविता यांच्या मालकीच्या सायकॉम कंपनीचे ओव्हरड्राफ्ट खाते गेल्या 13 वर्षांपासून बँक ऑफ इंडियाच्या कुलाब्यातील वुड हाऊस रोडवर असलेल्या शाखेमध्ये आहे. 8 जूनला एक अनोळखी व्यक्ती या कंपनीचा 5 लाख 85 हजार रुपयांचा धनादेश घेऊन बँक आला. 

या व्यक्तीने हा धनादेश रामजनम दशरथ यादव यांच्या नावाने असलेल्या सारस्वत बँकेच्या दादर शाखेतील खात्यात आरटीजीएसद्वारे रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी शाखेतील अधिकारी दिलीप भाडवलकर यांच्याकडे दिला. हा धनादेश बनावट असतानाही हुबेहूब बनविण्यात आल्याने भाडवलकर यांनी या धनादेशाची तपासणी करुन पुढील कारवाईसाठी संबंधितांकडे पाठविल्यानंतर नियमानुसार सदर रक्‍कम संबंधित खात्यावर ट्रांन्सफर झाली.

खातेधारकाने एटीएम आणि धनादेशाचा वापर करुन ही रक्कम जमा झालेल्या दिवशीच काढल्याचे तेथील बँक अधिकार्‍याने सांगितले. अखेर घडलेल्या या प्रकारानंतर कंपनीतर्फे कविता मिरचंदानी यांनी कफपरेड पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली. तसेच बँकेकडेही गेलेल्या पैशांची मागणी सुरु केली. बँकेतील अधिकार्‍यांच्या नजरचूकीने हा प्रकार घडला असल्यने नियमानुसार कंपनीची फसवणूक झालेली रक्कम आणि व्याज असे एकूण 6 लाख 50 हजार 945 रुपयांचा परतावा बँकेला करावा लागला.

गेल्यावर्षीच्या 2 जूनला ही रक्कम बँकेने कंपनीच्या खात्यात जमा केली. तसेच बँकेनेही पोलिसांत धाव घेत, कफ परेड पोलीस ठाणे आणि येथील पोलीस उपायुक्तांकडे लेखी तक्रारी दिल्या. या तक्रारीवरुन तपास करत अखेर कफपरेड पोलिसांनी बँकेच्या शाखा प्रबंधक प्रांजली काजारे (45) यांची फिर्याद नोंदवून घेत यादव विरोधात गुन्हा दाखल केला आला आहे. बँकेतील सीसीटिव्ही फुटेज आणि ज्या खात्यातून पैसे काढण्यात आले, त्या खात्याच्या आधारे आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.