Sat, Jul 20, 2019 08:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेमुळेच बंदमध्ये खरी रंगत

मनसेमुळेच बंदमध्ये खरी रंगत

Published On: Sep 11 2018 1:38AM | Last Updated: Sep 11 2018 1:04AMमुंबई : खास प्रतिनिधी

विरोधकांनी बंद करून दाखवावा, असे खोचक आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी दिले आणि सोमवारी कॉग्रेसने मुंबई संमिश्र का होईना पण बंद करून दाखवली. अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या पाठिंब्यामुळेच संमिश्र का होईना हा बंद यशस्वी झाला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही ठराविक भागातच आंदोलन केले. मनसेनेच ठिकठिकाणी केलेल्या कल्पक आंदोलनामुळे या बंदमध्ये खरी रंगत आली. बंद काळात मुंबईतील शाळा कॉलेजे आणि अन्य व्यवहार मात्र व्यवस्थीत सुरू होते.   

काँग्रेसने दिलेल्या देशव्यापी बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार नसल्याने मुंबईत हा बंद कसा यशस्वी होईल, याबद्दल उत्सुकता होती. मात्र, शिवसेनेची कमतरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंदला पाठिंबा देऊन भरून काढली. सकाळी अकराच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि मग खर्‍या अर्थाने बंद सुरू झाला. दादर, चेंबूर, माटुंगा, माहीम, यासह पश्‍चिम आणि पूर्व उपनगरात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यानंतर धडाधड दुकाने बंद झाली.

काळाचौकी येथे मनसैनिकांनी बसच्या काचा फोडल्याने सुरेश शिंदे या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली. शरद राव यांच्या  युनियनने बंदला पाठिंबा दिला नव्हता, मात्र भीतीपोटी शेकडो रिक्षा, टॅक्सीचालकांनी घरीच बसणे पसंत केले. मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन दुकाने बंद करण्यास भाग पाडले. दिंडोशीमधील भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांचे कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याने  त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. 

भाजपच्या कार्यालयावरही हल्ला चढवला.अंधेरी येथील डी. एन. नगर मेट्रो स्थानकात मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो रोखल्या.गोरेगावात बेस्टच्या बसची हवा काढून वाहतूक रोखण्याचा प्रयत्नही केला. दादर हा शिवसेनेबरोबर मनसेचाही बालेकिल्ला मानला जातो. तेथे मनसेचे नेते संदिप देशपांडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करीत असताना आणि दुकाने बंद करण्यास भाग पाडत असताना पोलिसांशी त्यांची बाचाबाची झाली.  घोळक्याने फिरत असलेल्या मनसे कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. या आंदोलनात खरी रंगत आली, ती मनसेच्या कल्पक निषेधामुळे! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीआधी दिलेल्या अच्छे दिनांच्या आश्‍वासनाची पूर्ती झालेली नसल्याने या अच्छे दिनांची अनोखी अंत्ययात्राही मनसेच्या कार्यकर्त्यांनी काढली. पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोडागाडीतुन मिरवणुक काढत सरकारच्या धोरणाचा निषेध केला. चेंबूरला ट्रेलर आडवा  लावून  महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. चेंबूरला झालेल्या दगडफेकीत सुमारे 40 ते 45 वाहनांचे नुकसान झाले. 14 बसच्या काचा फुटल्या तर 1 बसच्या टायरमधील हवा काढण्यात आली. काही ठिकाणी सजवलेल्या बैलगाड्यांमधून मनसेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करीत मिरवणूका काढल्या. चेंबूरमध्ये तर एका पेट्रोलपंपावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गाढवच धरून आणले होते. या वैविध्यपूर्ण आंदोलनांमुळे आजच्या बंदकाळात आणि नंतरदेखील काँग्रेसऐवजी मनसेचीच अधिक चर्चा शहरात झाली. 

विक्रोळी स्थानकात मनसेने रेल रोको केले, तर चेंबूर वाशी नाका व प्रतीक्षानगर डेपोतून बाहेर पडणार्‍या बसेसवर दगडफेक केली. मुलुंड रेल्वे स्थानकात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.