Thu, May 23, 2019 15:20
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बॅण्डचा बॅण्ड वाजला

बॅण्डचा बॅण्ड वाजला

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:29AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

लग्‍न म्हटले की, आठवतो तो बॅण्ड बाजा. सध्याच्या वेगवान युगात हा बॅण्ड बाजा काहीसा मागे पडला असला तरी अजूनही अनेक ठिकाणी त्याचा आवाज ऐकू येतो. मात्र या पथकांची अवस्था बिकट झाल्याचे चित्र आहे. काळबादेवी येथील 40 सदस्यांचा समावेश असलेला ‘न्यू गंधर्व ब्रास बॅण्ड’ ही त्याला अपवाद राहिलेले नाही. या सदस्यांना गुजराण करण्यासाठी अजूनही लग्‍न घरातून मिळत असणार्‍या टीपवर अवलंबून राहावे लागत आहे. 

या पथकाचे सदस्य असलेले अश्रफ हुसेन सांगतात, आमच्याकडे विविध प्रकारची वाद्ये आणि ड्रम वाजवणारे निष्णात कलाकार आहेत. पण ही कला त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न नीटसा सोडवू शकलेले नाही. या पथकात काहीजण उत्तर प्रदेशमधून आलेले तर काही मध्य प्रदेशातील. काही जण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेले सदस्यही या पथकाचा भाग आहेत. लग्‍न सराईत ते आपल्या काळबादेवीतील दुकानात ऑर्डरची वाट पाहात असतात. अश्रफ मूळचे मध्य प्रदेशातील. त्यांचा महिन्याचा पगार कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी पुरत नाही. त्यामुळे त्यांना टीप महत्त्वाची वाटते. 

अमरावतीचे असलेले 42 वर्षीय महादेव कळणे यांचे वडीलदेखील बॅण्ड वाजवायचे. अमरावतीतील लग्‍न समारंभात त्यांना विविध वाद्ये वाजवताना पाहात ते मोठे झाले. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर ते वडिलांच्या साथीला जाऊ लागले. काही वर्षांनंतर ते या बॅण्ड कंपनीचे भाग बनले. 1980 च्या दरम्यान कळणे कुटुंबीयांनी मुंबईत स्थलांतर केले. अमरावतीत मिळणार्‍या मिळकतीतून पोट भागत नव्हते. मुंबईत त्यामानाने चांगले पर्याय उपलब्ध होते. फार काळ रिकामे राहावे लागत नव्हते. 1988 पासून कळणे यांनी बॅण्ड वाजवण्यास सुरुवात केली. 1990 ते 2015 या काळात ब्रास बॅण्ड भरात होते. कमाईदेखील चांगली होत होती. लग्‍नाच्या हंगामात दिवसाकाठी 4 ते 5 बुकिंग मिळायची. आता हा व्यवसाय उतरणीला लागल्याचे कळणे म्हणाले. 

गेल्या काही वर्षांत सणासुदीत आणि लग्‍न समारंभात ढोल-ताशा पथकांच्या सादरीकरणाचे प्रमाण  वाढले. श्रीमंताघरचे लग्‍न असेल तर तिथे डीजे आणि इतर तत्सम संगीत व्यवस्था असते. त्याचा फटका ब्रास बॅण्डला बसला. सर्वात महत्वाचे म्हणजे नोटबंदी झाल्यानंतर वरातीमध्ये वाटल्या जाणार्‍या खैराती बंद झाल्या. त्याआधी लग्‍न घरची मंडळी सढळ हस्ते आम्हाला टीप देत होते. त्यातून चांगली कमाई होत होती. आता इव्हेंट मॅनेजमेंटचे दिवस सुरू झालेत. त्यातही मुंबईसारख्या शहरामध्ये वाहतुकीचे असंख्य प्रश्‍न निर्माण झालेले आहेत. ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा फटका ब्रास बॅण्डला बसला आहे, असे कळणे यांनी सांगितले. या बॅण्ड पथकाचे मालक असलेले प्रदीप मोरे यांच्या मते, हा व्यवसाय आता शेवटची घटका मोजतो आहे.