Thu, Jun 27, 2019 01:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे रुग्णालयातून बाळ पळवले!

ठाणे रुग्णालयातून बाळ पळवले!

Published On: Jan 15 2018 1:39AM | Last Updated: Jan 15 2018 1:37AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

अवघ्या सहा तासांपूर्वी जन्मलेल्या बाळाला आईला दाखवून आणते अशी बतावणी प्रसूती झालेल्या महिलेला करून तिचे बाळ एका अज्ञात महिलेने पळवल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात घडला. या घटनेने पुन्हा एकदा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

भिवंडी येथील आयजीएम रुग्णालयात मोहिनी भवर (19) या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालय प्रशासनाने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविलेे. शनिवारी रात्री 10.15 वाजता दाखल करण्यात आल्यानंतर काही वेळातच ती प्रसूतीदेखील झाली. यावेळी रुग्ण महिलेसोबत तिची आई व पती दोघेही होते. मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास रुग्णालयाच्या आवारात रुग्ण महिलेचा पती व तिची आई चहा पिण्यासाठी बाहेर गेले. त्याचवेळी एक 30 ते 40 वर्षीय अज्ञात महिला मोहिनीजवळ आली व तुमच्या आईने बाळाला बाहेर घेऊन येण्यास सांगितल्याची बतावणी केली. मोहिनीने  देखील त्या अज्ञात महिलेवर विश्‍वास ठेवत बाळाला तिच्या स्वाधीन केले. प्रसूती कक्षातील परिचारिका ही दुसरी प्रसूती करून तिच्याकडे बाळाला दूध पाजून झाले का, अशी विचारणा करण्यासाठी गेली असता, बाळाला आईकडे बाहेर पाठविले असल्याचे मोहिनीने परिचारिकांना सांगितले. परिचारिकांनी रुग्ण महिलेच्या आईला बाळाबाबत विचारणा केली असता, मी बाळाला आणण्यासाठी कोणत्याही महिलेला पाठविले नसल्याचे तिने सांगितले आणि घडला प्रकार उघड झाला. 

बाळाचा व अज्ञात महिलेचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते कोठेही आढळून आले नाही. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास सुरू केल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगीता माकोडे यांनी सांगितले.