होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पत्नीवर हल्ला

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पत्नीवर हल्ला

Published On: Jun 17 2018 1:43AM | Last Updated: Jun 17 2018 1:43AMमाटुंगा : वार्ताहर

प्रेयसीसोबत लग्‍न करण्यासाठी स्वतःच्याच पत्नीवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्‍ला केल्याची धक्‍कादायक घटना परळमध्ये उघडकीस आली आहे. याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती सुनील दरेकरला अटक करण्यात आली आहे. या घटनेत साक्षी दरेकर ही जखमी झाली आहे. 

साक्षी हिचा सुनील दरेकर याच्यासोबत 15 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. सुनील हा मुंबई महानगरपालिकेमध्ये आरोग्य खात्यात नोकरीला आहे. हे दाम्पत्य परळ विभागात राहते. साक्षी बॉलिवुडमध्ये हेयर स्टाईलिस्ट म्हणून नोकरी करते. गेल्या सहा वर्षांपासून सुनीलचे दुसर्‍या मुलीशी प्रेमसंबंध आहेत. मंगळवारी रात्री सुनीलने साक्षीला धमकावले. 4 लाख रुपये घेऊन माझ्या आयुष्यातून निघून जा. आम्ही दोघे लग्‍न करु असे तो साक्षीला सांगत होता. हा सर्व प्रकार साक्षी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होती. हे सुनीलच्या लक्षात येताच त्याने तिचा मोबाईल हिसकावून त्याचे दोन तुकडे केले. तिच्या तोंडावर उशी ठेवून हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचा गळा वायरच्या सहाय्याने आवळण्याचा प्रयत्न केला. साक्षीने स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर त्याने लोखंडी रॉडने तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ती बेशुद्ध  पडल्याचे वाटल्यानंतर किचनमधील वरवंटा आणण्यासाठी त्याने धाव घेतली. तेवढ्यात साक्षीने घराबाहेर पडत भोईवाडा  पोलीस ठाणे गाठले.

सुरुवातीला पोलिसांनी तक्रार देखील घेतली नाही. सामाजिक संघटनांच्या दबावानंतर पोलिसांनी दोन दिवसांनी  भादंवी 323, 324, 524,427 अंतर्गत गुन्हा नोंद करुन शुक्रवारी रात्री आरोपीला अटक केली.