Tue, Jul 23, 2019 02:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नशेच्या पैशासाठी आईवरच हल्‍ला!

नशेच्या पैशासाठी आईवरच हल्‍ला!

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 1:06AMमुुंबई : प्रतिनिधी

नशेसाठी एका महिलेवर तिच्याच मुलाने हल्ला करुन तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने घेऊन पलायन केल्याची घटना गिरगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपी मुलाला काही तासांत व्ही. पी. रोड पोलिसांनी अटक केली आहे. आमीर समीर शेख असे या 24 वर्षीय मुलाचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पाचशे रुपये दिले नाही म्हणून मुलाने आईवर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार महिला ही पी. बी मार्गावरील राजकोटवाला इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर राहते. तिचा आमीर हा मुलगा असून तो ड्रग्जच्या पूर्णपणे आहारी गेला आहे. काहीच काम न करता तो दिवस-रात्र ड्रग्जचे सेवन करुन आईशी भांडण करतो. अनेकदा तो तिच्याकडे नशेसाठी पैसे मागत होता, मात्र तिने पैसे देण्यास दिल्यास तो घरात धिंगाणा घालत होता. मंगळवारी दुपारी अडीच वाजता तो नशेतच घरी आला, त्याने त्याच्या आईकडे पाचशे रुपये नशा करण्यासाठी मागितले, तिने नकार देताच त्याने तिला बेदम मारहाण केली. त्यात तिच्या कानाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तिच्या अंगावरील सोन्याची चैन आणि कर्णफुल असा 90 हजार रुपयांचे दागिने घेऊन तो पळून गेला होता. या घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच व्ही. पी. रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आमीरला दरबार हॉटेलमधून बुधवारी अटक केली.