Sun, May 26, 2019 12:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधानसभा कामकाज गदारोळात तहकूब

विधानसभा कामकाज गदारोळात तहकूब

Published On: Dec 13 2017 2:30AM | Last Updated: Dec 13 2017 1:51AM

बुकमार्क करा

नागपूर : उदय तानपाठक

हिवाळी अधिवेशनाच्या सलग दुसर्‍या दिवशी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या प्रश्‍नावर विरोधकांनी तुफान घोषणाबाजी करून सभागृह तीनवेळा बंद पाडले. गदारोळ सुरूच राहिल्याने आज दिवसभरासाठी काम स्थगित करावे लागले.

सभागृह सुरू होताच अध्यक्षांनी प्रश्‍नोत्तरांचा तास पुकारला. मात्र, विरोधकांनी लगेचच कर्जमाफीची मागणी करीत घोषणा द्यायला सुरुवात केली. काही आमदार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन गोंधळ घालू लागले. या गदारोळातच प्रश्‍नोत्तरांचा तास सुरू होता. मात्र, घोषणाबाजीमुळे तीनवेळा कामकाज तहकूब करावे लागले. चौथ्यावेळीही गदारोळ सुरूच राहिल्याने दिवसभरासाठी सभागृह स्थगित करावे लागले.

राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा विदर्भ-मराठवाडाभर फिरून सोमवारीच नागपुरात पोहोचली. आज काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्‍त जनआक्रोश मोर्चा विधानभवनावर धडकणार होता. त्यामुळे विरोधकांचे कामकाजात फारसे लक्ष नव्हतेच. 

विधान परिषदही तहकूब

राष्ट्रवादी काँगे्रसचा हल्लाबोल मोर्चा आणि काँगे्रसचा जनआक्रोश मोर्चा या दोन्हीच्या पार्श्‍वभूमीवर आज विरोधी पक्षांनी विधानपरिषदेतील कामकाज रोखून धरले. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृह दोनदा तहकूब करावे लागले, तर तिसर्‍यांदा दिवसभरासाठी तहकूब केले गेले.  या गदारोळात वर्ष 2017-18 च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या, हे विशेष. दुपारी 12 वाजता कामकाम सुरू होताच सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रश्‍नोत्तरे पुकारली. मात्र, त्यांना प्रतिसाद न देता विरोधक घोषणा देत सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करू लागले.  

यावेळी संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी या गोंधळाला आक्षेप घेऊन या सदस्यांना जागेवर बसायला सांगा, अशी आग्रही मागणी केली. मात्र, विरोधी सदस्यांनी दाद न दिल्याने अवघ्या मिनिटाभरात सभापतींनी अर्ध्या तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. अर्ध्या तासानंतर कामकाज सुरू होताच विरोधक पुन्हा घोषणा देत वेलमध्ये धावले.