Mon, May 20, 2019 11:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हल्लेखोरास ४ दिवसांची पोलीस कोठडी

हल्लेखोरास ४ दिवसांची पोलीस कोठडी

Published On: Jan 15 2018 1:39AM | Last Updated: Jan 15 2018 12:48AM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

पैशांच्या देवाण-घेवाणीवरून बांधकाम व्यावसायिक गीतेश पाटील (33) यांच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी कुणाल पाटील (25, रा. सोनारपाडा) याला शनिवारी रात्री बेड्या ठोकल्या. त्याला कल्याण न्यायालयाने 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र उर्वरित आरोपींची नावे, पत्ते व गुन्ह्यातील गाड्यांची माहिती, सीसीटीव्ही फुटेज अशी संपूर्ण माहिती पोलिसांना देऊन 30 तासाहून अधिक कालावधी उलटूनही केवळ एकाच हल्लेखोरास अटक केल्याने पोलीस तपासांबद्दल पाटील कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बांधकाम व्यावसायिक तथा सावकार गीतेश पाटील यांच्यावर नांदीवली गावातील त्यांच्या बंगल्यावर शनिवारी मध्यरात्री काठ्या, स्टंप, तलवारीने जोरदार हल्ला चढवून खिडकीच्या काचा फोडल्या. तसेच घरात बंदुकीतून दोन राऊंडही झाडले. सुदैवाने यात पाटील कुटुंबीयातील कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरून मुख्य आरोपी महेंद्र खोत व त्याचे साथीदार तेजू मुंडे, कुणाल पाटील, निलेश मुंडे, शरद मुंडे, यांच्यासह 15 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांना हल्लेखोर लवकर मिळावेत यासाठी पाटील यांनी घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्हीतील हल्लेखोरांच्या गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज, त्यांची नावे, पत्ते व फोटो दिले. तरीही पोलिसांनी केवळ कुणाल पाटील हा एकच आरोपी पकडला. मात्र आलेल्या हल्लेखोर टोळीचा म्होरक्या महेंद्र खोत, तेजू मुंडे, निलेश  मुंडे, शरद मुंडे यांच्यासह 20 ते 30 अन्य हल्लेखोर कल्याण परिमंडळ-3 परिक्षेत्रात लपून बसले आहेत. जर त्यांना लवकर पकडले नाहीत तर ते आपल्यावर पुन्हा हल्ला करू शकतात. त्यामुळे जोपर्यंत हे सर्व आरोपी पकडत नाही तोपर्यंत आमच्या कुटुंबियांना या आरोपींकडून जीवास धोका असल्याने पोलिस संरक्षण द्यावे, असे पाटील कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मानपाडा पोलीस व ठाणे खंडणी विरोधी पथकाने सर्व आरोपींना लवकर पकडले नाही तर आम्ही पोलीस आयुक्त अथवा गृह खात्याकडे धाव घेणार असल्याचेही पाटील कुटुंबीयांनी पत्रकारांना सांगितले.