Sat, Jul 20, 2019 13:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्विनी बिद्रेंच्या मारेकर्‍यांना सरकार वाचवतंय? पतीचा खळबळजनक आरोप

अश्विनी बिद्रेंच्या मारेकर्‍यांना सरकार वाचवतंय?

Published On: May 24 2018 7:02PM | Last Updated: May 24 2018 7:02PMनवी मुंबई : प्रतिनिधी

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आश्वासने दिली होती. मात्र त्यापैकी त्यांनी एकही पाळले नाही. त्यावरून ते मारेक-यांना वाचवत आहेत, हे आता उघड झाले आहे, असा खळबळजनक आरोप अश्विनी यांचे पती राजू गोरे आणि भाऊ आंनद बिद्रे यांनी आज येथे केला. 

नेरूळ येथील सेक्टर २० मध्ये असलेल्या न्यू वेलकम हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदमध्ये राजू गोरे आणि आनंद बिद्रे यांनी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी सरकारच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्याचे उघड झाले असून न्यायालयात आरोपपत्रही दाखल झाले आहे. तरीही कुरुंदकरला गृहखात्याने अजून बडतर्फ केलेले नाही. त्याला मिळालेले राष्ट्रपती पदकही मागे घेण्यात आलेले नाही. या हत्याकांडाचा मुद्दा विधिमंळात उपस्थित झाला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याच्या आश्वासनासह अन्य अनेक आश्वासने दिली होती. मात्र त्यापैकी त्यांनी एकही पाळले नाही. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी हा पोलिस अधिकारी असून दुसरा आरोपी राजेश पाटील हा भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचा भाचा आहे. त्यामुळेच सरकार आणि पोलिस खाते त्यांना वाचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत आहे. आम्ही केलेल्या मागण्यांचा कोणताही विचार केला जात नाही, असाही आरोप यावेळी गोरे आणि बिद्रे यांनी केला.

संगिता अल्फान्सो यांच्याकडे तपासाचे पूर्ण अधिकार द्या!

 या गुन्ह्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त नीलेश राऊत हे आता सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे तपासाचे पूर्ण अधिकार सहाय्यक पोलिस आयुक्त संगीता अल्फान्सो यांच्याकडे देण्यात यावेत. या प्रकरणी आता न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे. नवीन तपास अधिकारी आला तर त्याला तांत्रिक मुद्दे न्यायालयासमोर मांडता येणार नाहीत. त्यामुळे अल्फान्सो यांची नियुक्ती शेवटच्या सुनावणीपर्यंत कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी राजू गोरे यांनी यावेळी केली. 

...तर आमच्या जिवाला धोका

अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी आरोपींनी सर्वच ठिकाणी हस्तक्षेप केले होते. त्यामुळे गुन्हा दाखल होण्यास वर्षभराचा कालावधी लागला. आता न्यायालयात आरोपपत्र  दाखल झाले आहे. जर आरोपी जामिनावर बाहेर आले तर ते पुराव्यांमध्ये फेरबदल करू शकतात. आमच्या जिवालाही धोका होऊ शकतो. त्यामुळे हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा आणि उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशीही मागणी यावेळी कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली.  

Tags : police, ashwini bidre, bidre murder issue, raju gore, anand bidre, API