Mon, May 20, 2019 09:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्‍विनी बिद्रे हत्या: कुरुंदकरचे राष्ट्रपती पदक रद्द करणार  

अश्‍विनी बिद्रे हत्या: कुरुंदकरचे राष्ट्रपती पदक रद्द

Published On: Mar 14 2018 7:55PM | Last Updated: Mar 14 2018 8:03PMमुंबई : प्रतिनिधी

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरचे राष्‍ट्रपती पदक रद्द करण्यात येणार आहे. त्‍याच्याविरोधात सबळ पुरावे मिळाल्‍यानंतर त्‍याच्याविरुद्द गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आली आहे. तसेच शासकीय सेवेतूनही त्याला निलंबित करण्यात आले आहे. 

गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल त्याला मंजूर झालेले राष्ट्रपती पोलिस पदक  रद्द करण्यासंदर्भात केंद्र शासनास शिफारस पाठविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत एका निवेदनाद्वारे दिली आहे.

पोलिस निरिक्षक असणार्‍या कुरुंदकर याच्यासारख्या अधिकार्‍याकडूनच जर सहकारी महिला पोलिस अधिकार्‍याची हत्या होणार असेल तर, राज्यातील जनतेच्या सुरक्षेच काय होणार असा प्रश्‍न राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला होता. तसेच कुरुंदकर याच्यावर गुन्हा दाखल झालेला असतानाही त्याला राष्ट्रपती पोलिस पदक देण्यात येत असल्याकडे लक्षवेधत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. 

बिद्रे यांच्या हत्‍येबाबत माहिती देताना, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी या गुन्ह्यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करून कुरुंदक याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या कुंदन भंडारी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे महेश फळणीकर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या तपासात कुरुंदकर याने अश्‍विनी बिद्रे यांची हत्या करून मृतदेहाची वसईच्या खाडीत विल्हेवाट लावल्याची माहिती पुढे आली आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही. ज्यांचा ज्यांचा सहभाग असेल त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.