होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण: आरोपी कुरुंदकरचे पदोन्नतीत नाव

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण: आरोपी कुरुंदकरचे पदोन्नतीत नाव

Published On: Jun 29 2018 2:24PM | Last Updated: Jun 29 2018 2:24PMनवी मुंबई: राजेंद्र पाटील  

एपीआय अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात तळोजा जेलमध्ये असलेले आरोपी पीआय अभय कुरूंदकरला गृहखात्याने आता सहायक पोलिस आयुक्त बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २६ जून रोजी जाहीर करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या निवड सूचीत सेवा जेष्ठतेनुसार  कुरुंदकर याचे पोलिस उप-अधिक्षकच्या निवड सुचीच्या यादीत अ.न. २२८ व सेवा  जेष्ठता १/१/२०१६ यादीत ८५६ ला आहे. यामुळे आता आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशीच काहीशी अवस्था गृहखात्याची झाली आहे. 

ठाणे ग्रामीणच्या पीसीआर विभागातील महिला पोलिस अधिकारी एपीआय अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी निलंबित पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर याचे 2018 - 2019  सालच्या पदोन्नत्ती यादीत नाव गृहखात्याने प्रसिद्ध केलेल्या यादीत झळकले आहे. यामुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

शासनाच्या २८/०६/२०१८ परिपत्रका नुसार अभय कुरुंदकर याचे पोलिस उप-अधिक्षकच्या निवड सुचीच्या यादीत अ.न.२२८ व सेवा  जेष्ठता १/१/२०१६ यादीत ८५६ ला नाव आले आहे. 

पोलिस महासंचालक कार्यालयाने तयार केलेल्या निवड सूचीतील गलथान कारभार असल्याचे अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी पुढारी ऑनलाईनशी बोलताना स्पष्ट केले. यादीत नाव यायलाच नको अशी भूमिका गोरे यांनी घेतली आहे. या अधिकाऱ्याला अजून बडतर्फ केलेले नाही शिवाय देण्यात आलेले पदक परत घेतले नाही. हा पूर्ण भोंगळ कारभार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 
अभय कुरुंदकर सध्या नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. नुकताच अलिबाग सत्र न्यायालयात त्याच्या वकिलांनी जामिनासाठी केलेला अर्ज  मागे घेतला. तळोजा जेल मध्ये डिसेबर २०१७ पासून आहे.