Tue, Mar 26, 2019 22:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्‍विनी बिद्रेंचा मृतदेह खाडीत फेकल्याचा संशय

अश्‍विनी बिद्रेंचा मृतदेह खाडीत फेकल्याचा संशय

Published On: Dec 18 2017 2:38AM | Last Updated: Dec 18 2017 2:38AM

बुकमार्क करा

मुंबई : वृत्तसंस्था

बेपत्ता महिला पोलिस अधिकारी अश्‍विनी बिद्रेे यांची पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर आणि त्याचा साथीदार राजेश पाटील यांनी हत्या करून त्यांचा मृतदेह भाईंदरच्या खाडीत फेकला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 7 ते 11 या वेळेत हत्या करण्यात आली असावी. भाईंदर खाडी परिसरात कुरूंदकर आणि राजेश पाटील यांच्या मोबाईलचे लोकेशन मिळाले आहे. बिद्रेे याचा मोबाईल त्याच रात्री 11 च्या सुमारास बंद झाल्याचे तपासात समोर आले आहे.

42 वर्षीय बिद्रेे नवी मुंबई पोलिसांच्या मानवाधिकार विभागात कार्यरत होत्या. 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास बिद्रेे या कुरूंदकराला पोलिस ठाण्यात भेटायला गेल्या होत्या. यानंतर अभय कुरूंदकर हा बिद्रेे यांना कारमध्ये घेऊन भाईंदरच्या दिशेने रवाना झाला. याचदरम्यान कुरूंदकरने बिद्रेे यांची कारमध्ये हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. ही घटना 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 6.41 ते रात्री 11.11 च्या दरम्यान घडली.

त्यानंतर रात्री 11.18 वाजता बिद्रेे यांचा मोबाईल बंद झाला. ज्या वेळेस बिद्रेे यांचा मोबाईल स्वीच ऑफ झाला, त्याचवेळी अभय कुरूंदकरने त्याचा साथीदार आणि राजेश पाटील याला फोन केल्याची माहिती फोन रेकॉर्डवरून उपलब्ध झाली आहे. त्यावेळी राजेश पाटील हा भाईंदरमधील एका बारमध्ये दारू पित बसला होता व कुरूंदकरने फोन करताच, तो त्यांना भेटायला गेला. या दोघांनी रात्री अश्‍विनी बिद्रेेंचा मृतदेह कारमधून काढून खाडीत फेकल्याचा संशय पोलिसांना आहे.

अभय कुरूंदकर स्वत:च एक पोलिस अधिकारी असल्याने तो तोंड उघडत नाही. मात्र, बिद्रेेंच्या घरात सापडलेल्या काही पुराव्यांवरून या दोघांत वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. अभय कुरूंदकरने बिंद्रेंना मारण्याची धमकी दिल्याचे एक पत्र बिद्रेेंच्या घरात मिळाले आहे. सोबतच बिद्रेे यांनी कुरूंदकर आणि त्यांच्यातील मोबाईल संभाषण घरातील कॉम्प्युटरमधील डिस्कमध्ये सेव्ह केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. 

काही व्हिडीओही हाती लागले आहेत. हे सर्व पुरावे व कुरूंदकर- पाटीलचे त्या रात्रीतील संभाषण आणि मच्छीमारांची साक्ष आदी घटना या प्रकरणात कुरूंदकर आणि राजेश पाटीलला दोषी ठरविण्यात पुरेसे ठरू शकतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे.