Mon, Mar 25, 2019 02:50
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी नौदलाची मदत

मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी नौदलाची मदत

Published On: Mar 03 2018 7:37AM | Last Updated: Mar 03 2018 7:37AMनवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा

अश्‍विनी बिंद्रे यांची हत्या केल्यानंतर वूडकटरने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकरने भाईंदरच्या घरातील फ्रीजमध्ये तब्बल तीन दिवस ठेवले होते. वसईच्या खाडीत फेकलेल्या या तुकड्यांचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिस आता थेट नौदलाची मदत घेणार आहेत.

अश्‍विनी बिंद्रेंची हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर एक एक भयंकर तपशील पोलिस तपासात हाती येऊ लागले आहेत. कुरूंदकर स्वत: अनुभवी पोलिस अधिकारी असल्याने अश्‍विनी यांच्या हत्येचे कुठलेच धागे मागे उरणार नाहीत, याची काळजी त्याने घेतल्याचे दिसते. सूत्रांनी सांगितले की, अश्‍विनी यांच्या शरीरातील रक्‍त गोठून त्याचे डाग कुठेही उरणार नाहीत, याची काळजी मारेकर्‍यांनी घेतली. त्यासाठी मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आले आणि चौथ्या दिवशी ते पिशवीत भरून भाईंदर आणि वसईच्या खाडीत फेकण्यात आले.

वाचा : अश्‍विनी बिंद्रे खूनप्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम

अश्‍विनी यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी सोमवारी नौदलाची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलिस दलातील उच्च अधिकार्‍याने ‘पुढारी’ला दिली. मात्र, हे तुकडे हाती लागण्याबद्दल पोलिसही साशंक आहेत. इतक्या प्रदीर्घ काळानंतर खाडीतून ते हाती लागू शकतील का, असा प्रश्‍न आहे. मात्र, तपास पथकाने न्यायालयात ठोस पुरावे सादर करण्यासाठी फळणीकरला खाडी किनारी आणि भाईंदर येथे नेले होते. त्यामुळे आता अश्‍विनीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात येणार आहे.

वाचा : अश्‍विनी बिद्रेंच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फेकले खाडीत

फॉरेन्सिक विभागाच्या तपास पथकाने शुक्रवारी भाईंदरमधील मुकुंद प्लाझा या इमारतीतील कुरूंदकरच्या घराची झडती घेतली. मृतदेहाचे तुकडे ज्या फ्रीजमध्ये ठेवले होते, तो ताब्यात घेण्यात आला. फ्रीज आणि त्याखालील थर्माकॉलचे स्टँड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फॉरेन्सिक तपासणीत पोलिसांच्या हाती आणखी सज्जड पुरावा लागू शकतो.