होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरक्षणाची अंमलबजावणी करा; अशोक चव्हाण 

आरक्षणाची अंमलबजावणी करा; अशोक चव्हाण 

Published On: Aug 07 2018 6:22PM | Last Updated: Aug 07 2018 6:22PMमुंबई : प्रतिनिधी

‘‘राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सामाजिक संघर्ष निर्माण होतो की काय अशी चिंता आज अनेकांना वाटत आहे. त्या-त्या वेळच्या सरकारने आरक्षणे दिली मात्र, त्याची अंमलबजावणी होते की नाही हा खरा प्रश्न आहे. देशात सामाजिक संघर्षाऐवजी सामाजिक एकोपा निर्माण झाला पाहिजे. तसेच देशात ज्या समाजाला आरक्षण दिले आणि जेवढे दिले त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्‍त केले आहे. 

वरळी येथे आयोजित केलेल्‍या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाअधिवेशनात अशोक चव्हाण बोलत होते. ते म्‍हणाले, ‘‘ज्या राजकारण्यांना संधी मिळाली, त्यांचे भले झाले, अनेकजण आमदार, खासदार, मंत्री झाले, पण समाज आहे तिथेच आहे. समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे. सरकारने या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावू नयेत.’’

अशोक चव्हाण यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्‍यांनी ओबीसी समाजासाठी केलेल्‍या घोषणांची अम्मल बजावणी करण्याचीही विनंती केली. ते म्‍हणाले, ‘‘ज्या घोषणा तुम्ही करता त्याची अंमलबजावणी आपण करतो की नाही याचा वर्षातून एकदा आढावा तरी घ्या. महाअधिवेशनाच्या आयोजकांना माझी विनंती आहे, या व्यासपीठावरून ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी झाली की नाही याचा आढावा पुढच्या अधिवेशनात घ्यावा.’’

‘‘येत्या दोन अर्थसंकल्पात ओबीसी महामंडळासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद केली जाईल. तसेच ओबीसींच्या हिताच्या योजना राबवताना भाजप सरकार हात आखडता घेणार नाही. त्यांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवू.’’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या ठिकाणी केली आहे.