Fri, Jul 19, 2019 22:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शस्त्रास्त्रे, स्फोटकांच्या वाहतुकीसाठी वापलेली कार आणि मोटारसायकल जप्त

एटीएसचे नालासोपार्‍यात आणि पुण्यात छापे

Published On: Aug 13 2018 8:05PM | Last Updated: Aug 13 2018 7:58PMमुंबई : प्रतिनिधी

हिंदूवादी संघनटेचे वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्या कसून चौकशीनंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा आणि पुण्यामध्ये छापेमारी केली. यात गुन्ह्यात शस्त्रास्रे आणि स्फोटके ने-आण करण्यासाठी वापरलेल्या कार व मोटारसायकलसह आणखी शस्त्रसाठा आणि महत्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत.

नालासोपार्‍यातील भंडारआळीमध्ये राहात असलेल्या राऊत याच्या घर आणि दुकानगाळ्यावर गुरुवारी छापा टाकून मोठ्या प्रमाणातील शस्त्रसाठ्यासह एटीएसने त्याला बेड्या ठोकल्या. तसेच याच परिसरातील एका इमारतीमधून त्याचा साथिदार कळसकर यालाही अटक केली. त्यानंतर एटीएसने रविवारी पुन्हा छापेमारी करुन नालासोपार्‍यातून ५ गावठी पिस्तूलांसह ३ अर्धवट बनावट पिस्तूले, ९ मी.मी. ची ११ काडतूसे, ७.५ मी.मी. ची ३० काडतूसे आणि शस्त्रांस्त्रांचे मोठ्याप्रमाणात सुटे भाग हस्तगत केले.

गोंधळेकर याच्याकडून दोन दिवसांपूर्वीच मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर एटीएसच्या पथकाने पुण्यात छापेमारी करुन शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांची ने-आण करण्यासाठी गुन्ह्यात वापरलेली कार व मोटारसायक जप्त केली. तसेच एका लॅपटॉपसह ६ हार्डडीस्क, ५ पेनड्राईव्ह, ९ मोबाईल, अनेक सिमकार्डस, वायफाय डोंगल आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. या कारवाईत तब्बल ९ मोबाईल आणि अनेक सिमकार्ड सापडल्याने कारवाईची व्याप्ती आणखी वाढली असून यासर्व कार्डसचा तपशील एटीएसने मागविला आहे. तसेच या मोबाईलमधील डाटा रिकव्हर करण्याचाही प्रयत्न एटीएसने सुरू केला आहे.

राऊत, कळसकर आणि गोंधळेकर यांच्याकडे कसून चौकशी सुरू असली तरी, संशयीत म्हणून ताब्यात घेतलेल्या त्या १२ ते १३ जणांना एटीएसने क्‍लिनचीट दिलेली नाही. त्यांच्याकडेही एटीएसचे अधिकारी चौकशी करत असून येत्याकाळात आणखी काहींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते.