Sat, Jul 20, 2019 15:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भारतीय डॉक्टरांच्या रेबीजविरोधी औषधाला जागतिक संघटनेची मान्यता 

भारतीय डॉक्टरांच्या रेबीजविरोधी औषधाला जागतिक संघटनेची मान्यता 

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 1:12AMमुंबई : प्रतिनिधी

डॉ. ओमेश कुमार भारती हे हिमाचलप्रदेशच्या इन्ट्रा डर्मल अ‍ॅन्टी-रेबीज क्लिनिक आणि रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत असून गेल्या अनेक वर्षांपासून रेबीजविरोधी औषधांवर संशोधन करत आहेत. त्यांच्या नव्या संशोधनावर जागतिक आरोग्य संघटनेने शिक्कामोर्तब केले आहे. डॉ. भारती यांच्या संशोधनामुळे देशातील लाखो लोकांना रेबीजविरोधी औषधे परवडणार्‍या दरात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

देशात दरवर्षी हजारो लोकांचा रेबीजमुळे मृत्यू होतो. रेबीजवर उपचार प्रचंड महाग आहेत. गरीबांना हे महागडे उपचार परवडत नाहीत. रेबीजमुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणणे शक्य आहे का? लोकांना परवडणार्‍या दरात उपचार देणे शक्य आहे? या भावनेतून डॉ. भारती यांनी काम सुरू केले.डॉ. भारती यांच्या रेबीजविरोधी औषध पद्धतीवर जागतिक आरोग्य संघटनेने शिक्कामोर्तब केले आहे.  जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगभरातील रेबीजविरोधी उपचार पद्धतीतली ही सर्वात कमी खर्चाची उपचार पद्धत आहे. यामुळे रेबीजविरोधी उपचारांचा खर्च जवळपास 100 पटीने कमी होणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतल्यानंतर डॉ. भारती म्हणाले, हिमाचलप्रदेशमध्ये रेबीजमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. हे मृत्यू मी पाहिले आहेत. रेबीजविरोधी लस खूप महाग आहे, बर्‍याच वेळी लस उपलब्ध नसते. त्यामुळे आम्ही परवडणार्‍या दरात चांगले उपचार कसे होऊ शकतील यावर संशोधन केले. 2014 पासून जवळपास 20 हजार लोकांवर आम्ही या नव्या पद्धतीने उपचार केले. या उपचार पद्धतीमुळे रेबीजविरोधी औषधांची किंमत फक्त 350 रुपये प्रति रुग्ण येते, सध्या महागड्या औषधांची किंमत 35 हजार रुपये आहे.