Wed, Aug 21, 2019 19:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंशकालीनच्या पदवीधरांना कंत्राटी तत्त्वावर नोकरी!

अंशकालीनच्या पदवीधरांना कंत्राटी तत्त्वावर नोकरी!

Published On: Feb 18 2018 9:14AM | Last Updated: Feb 18 2018 9:14AMमुंबई : प्रतिनिधी

नोकरी मिळेल या आशेने राज्यातील लाखो तरुण दरवर्षी सेवायोजन कार्यालयाकडे नाव नोंदणी करतात. या सुशिक्षित बेकारांना दिला जाणारा बेकार भत्ता बंद करून पदवीधर अंशकालीन योजना सुरू करण्यात आली. कालांतराने ही योजनादेखील बंद करण्यात आली. या योजनेंतर्गत काम करणार्‍या उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर सरकारी सेवेत नियुक्‍ती देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.

सुशिक्षित बेरोजगारांना देण्यात येणारा बेकारी भत्ता बंद करून 1990-91 च्या दरम्यान राज्यात पदवीधर अंशकालीन कर्मचारी योजना सरकारने आखली. 2003 च्या दरम्यान या योजनेंतर्गत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना घरचा रस्ता दाखवत सरकारने सुशिक्षित बेकारांसाठी असणारी योजनाच बंद केली. या योजनेंतर्गत काम करणार्‍या उमेदवारांच्या कर्मचारी संघटनेच्या वाढत्या दबावामुळे 2009 मध्ये निवडणुकांच्या तोंडावर अंशकालीन कर्मचार्‍यांना शासकीय नोकरीत 10 टक्के आरक्षण जाहीर केले. मात्र, त्याची अंलबजावणी झाली नाही.

आता तर नोकर भरतीच बंद असल्याने अंशकालीन म्हणून नोंदणी झालेल्या जवळपास 18 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवार म्हणून नोंद असलेल्या या उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारी पातळीवर पुन्हा एकदा विचारविनिमय सुरू झाला आहे.

विशेष बाब म्हणून अंशकालीन उमेदवारांचे प्रलंबित प्रश्‍न व त्यांना कंत्राटी तत्त्वावर नोकरी उपलब्ध करून देण्याबाबतचे धोरण निश्‍चित करण्यात येत आहे. यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यांची समिती स्थापण्यात आली आहे.