Sat, Apr 20, 2019 07:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तास वाढवू नका, जयंती,पुण्यतिथीच्या सुट्ट्या रद्द करा !

तास वाढवू नका, जयंती,पुण्यतिथीच्या सुट्ट्या रद्द करा !

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

गुणवत्ता वाढविण्यासाठी आठ तास शाळा चालवावी, अशी मागणी शिक्षणतज्ज्ञांकडून पुढे येत आहे. शाळेचे तास वाढविण्याऐवजी जयंती, पुण्यतिथीच्या नावाने शाळांना मिळणार्‍या सुट्ट्या कशाला असा सूर शिक्षण विकास मंचच्या व्हॉट्सअ‍ॅप कट्ट्यावर शिक्षकांकडून व्यक्‍त करण्यात आला. कामकाजाचे दिवस वाढवावेत असाच शिक्षकांचा कल होता. 

राज्यात जयंती-पुण्यतिथींना बहुतांश प्रमाणात सुट्टी देण्यात येते, त्याऐवजी पूर्णवेळ शाळा भरवून परिपाठात हे उपक्रम घेता येतील. खेडेगावात अशा दिवसांना मोठी मुले शाळेत न येता सुट्टी म्हणून शेतात जातात, तेही प्रमाण कमी होईल. राज्यातील विदर्भ वगळता सर्वच जिल्हा परिषदांच्या  शाळा 15 जूनला सुरू होतात व पटनोंदणी, उपस्थिती, कामकाज सुरळीत होण्यास जुलै महिना उजाडतो. त्याऐवजी शाळा 3-4 जूनपासून सुरू केल्यास 15 जूनपर्यंत त्या मार्गी लागून कामकाजास जास्त वेळ मिळू शकतो, असा उपाय शिक्षण विकास मंचचे सदस्य नितीन खंडाळे यांनी समोर आणला आहे.

पहिल्या व तिसर्‍या शनिवारी सुट्टी देऊन इतर शनिवारी पूर्णवेळ शाळा भरवावी, म्हणजे शालेय कामही सुरळीत होईल व शिक्षकांना त्यांच्या कार्यालयीन कामांसाठी दांडी मारावी लागणार नाही, असेही खंडाळे यांनी सुचविले. बहुतेक ग्रामीण व काही शहरीही भागात पारशी, शीख, ख्रिश्चन, जैन इ. अल्पसंख्य समुदायाचे एकही घर नसते, तेथे धार्मिक सुट्ट्या देऊ नयेत, असा उपाय मांडण्यात आला.