Sun, May 26, 2019 00:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरीचा गोखले पूल रुळांवर

अंधेरीचा गोखले पूल रुळांवर

Published On: Jul 04 2018 2:16AM | Last Updated: Jul 04 2018 2:00AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जीवनवाहिनी समजली जाणारी रेल्वे वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली. मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अंधेरी -विलेपार्ले दरम्यान पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने मलब्याखाली अडकून पाच जण जखमी झाले. ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून ढिगार्‍याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

या अपघातामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली. चर्चगेट ते विरार या म मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू केले. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वर कोसळलेल्या पूलाच्या मलब्याखाली अडकलेल्या 5 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यास जवांनाना यश आले. या घटनेत द्वारकाप्रसाद शर्मा (47), मनोज मेहता (52), हरीष कोहाटे (45), गिंधम सिंग आणि एक साठ वर्षीय महिलेचा जखमींमध्ये समावेश असून या सर्वांना पालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

अंधेरी स्थानकाच्या दक्षिण दिशेला हा पूल पूर्व पश्चिम दिशेला जोडणारा आहे. पुलाचा भाग कोसळल्यामुळे ओव्हर हेड वायर मधील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला असून वाहतूक सुमारे 5 ते 6 तासासाठी बंद ठेवण्यात आली. विरार ते चर्चगेट या मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. चर्चगेटहून वसई-विरारकडे जाणारे अनेकजण पार्ले, खार भागात उभ्या करण्यात आलेल्या रेल्वेमध्ये अडकून पडले. शिवाय सकाळी सकाळी ऑफिससाठी निघालेल्या चाकरमान्यांना बराच काळ रेल्वेत अडकून राहावे लागले. मात्र वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने अनेकांनी लोकलमधून उतरुन पायी जाणे पसंद केले. 

एनडीआरएफ जवान आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 च्या मार्गावरील मलबा हटविण्यात आला. त्यानंतर हार्बर मार्गावरील पहिली लोकल चर्चगेट ते गोरेगाव या मार्गावर सोडण्यात आल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. मात्र एकूण 9 रुळांवर मलबा मोठ्या प्रमाणात असल्याने तो हटवण्यासाठी अजून बराचसा वेळ लागणार असल्याने जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतुक पूर्वपदावर येण्यास मध्यरात्र उलटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

पुलाचा बराचसा भाग रेल्वे रुळांवर पडल्याने, तसेच ओव्हरहेड वायर तुटल्याने सुरुवातीला वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अंधेरी ते बोरिवलीपर्यंत लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या होत्या. सध्या वांद्रे ते चर्चगेट आणि गोरेगाव ते विरार वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या अपघातात प्लॅटफॉर्मचे बरेच नुकसान झाले आहे. शिवाय मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत असल्याने मलबा हटविण्यास उशीर होत असल्याचे एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. 

मलबा हटवण्याचे आव्हान 

घटनास्थळी पालिका प्रशासन, रेल्वे प्रशासन, अग्निशामक दल, आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी धाव घेत सकाळी 8 पासून मलबा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले.  यात  लोखंडी गज, सिमेंट काँक्रिटचे कठडे, माती, रेल्वे स्थानकावरील पत्रे आणि वायरिंगचा समावेश होता. यासाठी 6 क्रेन, 5 ते 6 जेसीबी, 10 ते 15 डम्पर, अग्निशामक दलाचे जवान, पालिका-रेल्वेचे अधिकारी कर्मचारी, आरपीएफ,  अंधेरी पोलिसांसह 200 ते 300 कामगारांचा समावेश होता. मध्यरात्रीपर्यंत रेल्वेसेवा सुरु होऊ शकते, अशी शक्यता उपस्थित रेल्वे अधिकार्‍यांनी व्यक्त केली.