Mon, Mar 25, 2019 13:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महानायकाकडून आमटे यांच्या 'लोक बिरादरी'ला २५ लाख

महानायकाकडून 'लोक बिरादरी'ला २५ लाख

Published On: Sep 08 2018 1:43PM | Last Updated: Sep 08 2018 3:28PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

महानायक अमिताभ बच्चन यांच्या एका खासगी टीव्हीवरील 'कौन बनेगा करोडपती' या गेम शोमध्ये पद्मश्री डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी काल २५ लाख रुपये जिंकले. यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतः २५ लाखांची देणगी लोक बिरादरी प्रकल्पाला दिली आहे, मात्र बच्चन यांनी या देणगीचा उल्‍लेख कार्यक्रमामध्ये टाळला. ही माहिती आमटे यांच्या फेसबुक अकाऊंटवरून देण्यात आली आहे. 

लोक बिरादरी प्रकल्‍पाची जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख आहे. त्यांच्या कामाची दखल अनेक संस्‍थांनी घेतली आहे. काल अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाध्ये आमटे दांपत्‍य सहभागी झाले होते. खेळ खेळून त्यांनी २५ लाखाची रक्‍कम जिंकली. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार असलेले अमिताभ बच्चन यांनी कार्यक्रम झाल्यावर लोक बिरादरीसाठी २५ लाखांची देणगी देत असल्याचे आमटे दांपत्‍यांना व्‍यक्‍तिगत सांगितले.

अमिताभ बच्चन यांनी स्वतःचे २५ लाख रुपये महारोगी सेवा समिती वरोराद्वारा संचालित लोक बिरादरी प्रकल्पाच्या खात्यात जमा केले आहेत. अमिताभ यांनी स्वतःच्या देणगीचा कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात जाहीर उल्लेख केला नाही ही गोष्टी मोठी असल्याचे आमटे यांनी सांगितली. 

अमिताभ बच्चन यांच्या या मदतीनंतर गडचिरोली जिल्ह्यात यापुढे संपूर्ण भारतातून जनता भेट द्यायला येईल अशी अपेक्षा त्यांनी व्‍यक्‍त केली आहे. या दुर्गम भागात सुसज्य दवाखान्यात चांगली आरोग्य सेवा, दर्जेदार शिक्षण, पर्यावरण व वन्यजीव संरक्षण, बांबू हस्तकला, पाण्यासाठी गावागावात मोठे तलाव व गाव विकास अशा कार्यातून या भागातील आदिवासी बांधवांचा विकास साधण्याचा प्रयत्‍न करीत असल्याचे आमटे यांनी सांगितले.