Tue, Mar 26, 2019 01:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘या’ स्कायवॉकवरून जाताना मान शर्मेने खाली जाते!

‘या’ स्कायवॉकवरून जाताना मान शर्मेने खाली जाते!

Published On: Dec 20 2017 10:17AM | Last Updated: Dec 20 2017 10:17AM

बुकमार्क करा

अंबरनाथ: प्रतिनिधी

नागरीकांच्या सोयीसाठी एमएमआरडीएने अंबरनाथ पश्चिम भागातील रेल्वे स्थानक ते नगरपरिषद मुख्यालयापर्यंत स्कायवॉक बांधला खरा. पण या स्कायवॉकवर प्रेमीयुगुलांचाच राबता असल्याने व त्यांचे अश्लील चाळे या स्कायवॉकवर सुरू असल्याने सर्वसामान्यांना आपली मान शर्मेने खाली घालण्याची वेळ येत आहे.

तब्बल 11 कोटी रुपये खर्च करुन एमएमआरडीएने 350 मीटर लांबीचा स्कायवॉक अंबरनाथ पश्चिम भागातील रेल्वे स्थानक ते नगरपरिषद मुख्यालय असा बांधला आहे. हा स्कायवॉक एमएमआरडीएने नगरपरिषदेकडे हस्तांतरीत केला असल्याने या स्कायवॉकची देखभाल, दुरुस्ती व लाईट व्यवस्थेची जबाबदारी आता अंबरनाथ नगरपरिषदेची आहे. हा स्कायवॉक अंबरनाथ नगरपरिषद मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर उतरविण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी अनेक लोक या स्कायवॉकचा वापर करीत असतात. मात्र या स्कायवॉकवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा तो सध्या प्रेमीयुगुलांचा अड्डा झाला आहे. हे प्रेमी युगुल केवळ एकमेकांशी बोलत उभे नसतात तर अश्लील चाळेही करीत असतात. त्यामुळे सर्वसामान्यांना या स्कायवॉकवरून जाताना शर्मेने मान खाली घालूनच जावे लागते. एमएमआरडीएने बांधलेला हा स्कायवॉक अंबरनाथ नगरपरिषदेकडे हस्तांतरीत केल्याने या स्कायवॉकवरील सुरक्षा व इतर सुविधा पुरविणे पालिकेचे काम आहे. मात्र पालिकेचे या स्कायवॉककडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलीसही या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने सर्वसामान्यांची चांगलीच गोची झाली आहे. अशा प्रकारावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

स्कायवॉकवर सुरक्षा रक्षक नेमणुकीसाठी प्रस्ताव तयार केला असून तशी मागणीही करण्यात आली आहे. लवकरच या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात येईल. - मनिष भामरे, नगर अभियंता