Thu, Jun 20, 2019 06:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › व्हॉट्सअ‍ॅपला मनाई; मुलीने सोडले घर

व्हॉट्सअ‍ॅपला मनाई; मुलीने सोडले घर

Published On: Mar 24 2018 1:51AM | Last Updated: Mar 24 2018 1:27AMअंबरनाथ : प्रतिनिधी

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याच्या आहारी गेलो असे म्हटले जाते. सध्या सोशल मीडियाचेही असेच झाले आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपचा अतिवापर सर्वांकडूनच केला जात आहे. याचाच प्रत्यय अंबरनाथ येथे आला असून, व्हॉट्सअ‍ॅप वापरू न दिल्याने एका अल्पवयीन मुलीने चक्‍क घरातून पळ काढला. मात्र घराबाहेर संपूर्ण रात्र काढल्यानंतर घाबरलेल्या या मुलीला पोलिसांच्या मदतीने तिच्या घरी सुखरुप पोहचविण्यात यश आले आहे. 

अंबरनाथ पश्‍चिम भागात राहणारी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. या मुलीला मोबाईलचे प्रचंड वेड असून ती सतत व्हॉट्सअ‍ॅपवर गुंग असते. त्यामुळे सारखी मोबाईमध्ये काय करते, तुझा मोबाईलच बंद करते, अशा शब्दात या मुलीची आई तिला ओरडल्याने या मुलीने चक्‍क घरातून पलायन केले. ती अंबरनाथवरून थेट नवी मुंबईला पोहोचली. दिवसभर ती मोबाईल आणि मित्रांच्या संपर्कात राहिल्याने तिला काही वाटले नाही. मात्र, जस जशी संध्याकाळ होत गेली तस तशी तिच्या मनातली भीती जागृत होत गेली. त्यामुळे आपल्याला घरी जायला पाहिजे या चिंतेत भयभीत झालेल्या अवस्थेत असताना एका महिलेला या मुलीने सर्व प्रकार सांगितला. 

या महिलेने तिला नवी मुंबईच्या एपीएमसी पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर येथील पोलिसांनी अंबरनाथ पोलिसांशी संपर्क साधून या मुलीबाबत माहिती दिली. दरम्यान, मुलगी रागाने घरातून निघून गेली असल्याची तक्रार या मुलीच्या पालकांनी केली होती. अंबरनाथ पोलिसांनी तात्काळ या मुलीच्या पालकांना संपर्क करून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. मात्र, मोबाईलमुळे अशा विचित्र वागणार्‍या मुलीला आम्ही घरात घेणार नाही, असे पालकांनी सांगितल्यानंतर पोलीसही चिंतेत पडले. यानंतर पोलिसांनीच पालक आणि मुलीचे समुपदेशन केल्याने व पुन्हा मोबाईलच्या आहारी जाणार नाही, असे या मुलीकडून वदवून घेतल्याने या मुलीला पुन्हा तिच्या पालकांनी आपल्या  घरी नेले.
 

 

tags : ambarnath,news, parent, not, give, whats, app,girl,lift, house, in ambarnath,