Sun, Jul 05, 2020 21:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'पंधरा दिवसांच्या आत सर्व स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवा'

'पंधरा दिवसांच्या आत सर्व स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवा'

Last Updated: Jun 05 2020 4:34PM

file photoनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

येत्या 15 दिवसांच्या आत सर्व स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्राबरोबरच सर्व राज्य सरकारांना दिले. मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह त्यांना कशा प्रकारे मदत केली जात आहे, हे सर्व राज्यांनी रेकॉर्डवर आणावयाचे असून सर्व मजुरांचे नोंदणीकरण केले जावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

वाचा : पुढील एक वर्ष केंद्राकडून कोणतीही नवी योजना सुरु होणार नाही : अर्थमंत्रालय 

आतापर्यंत एक कोटी मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात आले असल्याची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुनावणीदरम्यान दिली. रस्ते मार्गाने 41 लाख तर रेल्वेने 57 लाख मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात आले आहे. मजुरांना पोहोचविण्यासाठी 4 हजार 270 रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या असून सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश व बिहारसाठी सोडण्यात आल्या असल्याचे मेहता यांनी नमूद केले.

वाचा : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये आणखी एका काँग्रेस आमदाराचा राजीनामा

मजुरांना हरतऱ्हेची मदत करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार राज्य सरकारांच्या संपर्कात आहे. आता राज्य सरकारांनाच अजून किती मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचे आहे व त्यासाठी किती गाड्या सोडाव्या लागतील, हे सांगायचे आहे. केंद्र सरकारकडून योजण्यात आलेल्या उपायांची माहिती एका प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहे. दिल्लीत दोन लाख मजूर असून त्यांनी दिल्लीतच राहणे पसंत केले आहे. मूळगावी जाण्याची इच्छा व्यक्त केलेल्या मजुरांची संख्या दहा हजारापेक्षा कमी आहे, असे मेहता यांनी सांगितले.