Sun, Mar 24, 2019 22:59
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नितीन आगे हत्या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार : मुख्यमंत्री

नितीन आगे हत्या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार : मुख्यमंत्री

Published On: Dec 05 2017 2:54PM | Last Updated: Dec 05 2017 2:54PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

खर्डा (जि. नगर) येथील नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी १३ साक्षीदार फितुर झाल्याने या प्रकरणातील ९ आरोपी निर्दोष सुटले आहेत. याबाबत राज्य सरकार अतिशय गंभीर असून फितुर साक्षीदारांवर कारवाई होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

खर्डा या कर्जत तालुक्यातील गावात नितीन आगे या १७ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील ९ संशयितांची अहमदनगर न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. २६ पैकी १३ साक्षीदार फितुर झाल्याने सबळ पुराव्याअभावी त्याचा निकालावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर नितीन यांचे वडील राजू आगे यांनी काल (दि. 4 डिसेंबर) मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्‍यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. 

१३ फितुर साक्षीदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.  त्याबाबतचा पोलिसांचा प्रस्तावही विधि व न्याय विभागाकडून सादर करण्यात येत आहे.