Mon, May 20, 2019 20:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तावडेंविरोधात भाजपातही खदखद

तावडेंविरोधात भाजपातही खदखद

Published On: Mar 19 2018 1:47AM | Last Updated: Mar 19 2018 1:23AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मुंबईमधील शिक्षकांचे पगार सरकारी बँकेतूनच करावे, या मागणीसाठी शिक्षक भारती या संघटनेच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याविरोधात आंदोलन केले जात असताना आता भाजप संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनेही या विषयावरून तावडे यांच्याविरोधात आंदोलन करीत आपली खदखद व्यक्त केली आहे. मुंबईमधील 27 हजार शिक्षकांचे गेल्या दोन महिन्यांपासून पगार रखडविण्यास तावडेच कारणीभूत असल्याचा आरोप करत शिक्षक परिषदेने रविवारी तावडेंच्या सेवासदन या शासकीय बंगल्यासमोर काळी गुढी उभारली.

मुंबईमधील शिक्षकांचे पगार सरकारी बँकेतून करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पण या आदेशाचे पालन झालेले नाही. वेतनाअभावी अनेकांच्या गृहकर्जाचे हफ्ते व मुलांची शैक्षणिक फी रखडली आहे. धनादेश बाऊन्स होत असल्याने मुंबईतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्रस्त झाले आहेत. 

या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी अनिल बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी 8 वाजता सुभाष अंभोरे, बी. पी. घेरडे, नरेंद्र पाठक व इतर कार्यकर्त्यांनी तावडे यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारासमोर काळी गुढी उभारली. दोन दिवसांमध्ये शिक्षकांच्या बँक खात्यामध्ये वेतन जमा न केल्यास 20 मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्याचा इशारा बोरनारे यांनी दिला.

शिक्षक परिषदेच्या या आंदोलनाची दखल तावडे यांनी घेतली असल्याचा दावा करण्यात आला आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर दोन दिवसात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा होईल, असे आश्‍वासन तावडेंनी आपल्याला दिले असल्याचे बोरनारे यांनी सांगितले.