उल्हासनगर (ठाणे) : प्रतिनिधी
उल्हासनगर येथे भरवस्तीत एका घरात शिरलेल्या बिबटयाला जेरबंद करण्यात अखेर यश आले. सुमारे सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर वनविभाग आणि पोलिसांनी या बिबटयाला जेरबंद केले. ही घटना आज (रविवार, 18 मार्च) सकाळच्या सुमारास उल्हासनगरातील कॅम्प नं. ५ येथील भाटीया चौक परिसरातील सोनम क्लासेस समोर घडली. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच शहरात बिबटया शिरल्याने एकच गोंधळ उडाला. भरवस्तीत बिबटया येण्याच्या घडना अलिकडे वाढतानाच दिसत आहेत. या घडनेने उल्हासनगर परिसरात सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उल्हासनगरातील कॅम्प नं. ५ येथील भाटीया चौक परिसरातील सोनम क्लासेसच्या कंपाउंडमधून बिबटया बाहेर सुरेश असराणी यांच्या बंगल्यात गेल्याचे रवि कुंभार या तरूणाला दिसले. नागरिकांनी याची माहिती असराणी यांना दिली असता त्यांच्या कुंटुंबानी बंगल्याबाहेर धाव घेतली. असराणी यांनी नक्की बिबट्याच घरात शिरला आहे का? याची खात्री करण्यासाठी प्रथम सोनम क्लासेसमधील सिसिटीव्ही फुटेजची पाहणी केली. या सिसिटीव्ही फुटेजमध्ये बिबट्याचे असल्याचे दिसून आले.
नागरिकांनी त्वरीत यासंबंधीची माहिती पोलिसांना दिली. तर या घटनेची माहिती ठाणे वनविभागास मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या पथकांने असराणी यांच्या बंगल्याला चारही बाजूंनी बिबटयाला पकडण्यासाठी सापळा रचला. अथक प्रयत्नानंतर वनकर्मचाऱ्यांना बिबटया बंगल्यातील एका कोप-यात असल्याचे दिसताच कर्मचाऱ्यांनी बंदुकीच्या साह्याने त्याला गुंगीचे इंजेक्शन दिले. बिबट्या बेशुध्द झाल्यावर त्याला बंगल्यातून बाहेर काढण्यात आले. सुमारे सहा तास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा हा थरार सुरु होता. तर बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मात्र, हा बिबटया नेमका कोठून, आणि कसा आला याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. हाजिमलंगजवळील जंगल भागातूनच हा बिबट्या आला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बिबटयाला वनविभागाने ताब्यात घेतले असून त्याची तपासणी केल्यावर त्याला सुखरूपपणे दाट जंगलात सोडण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
Tags : mumbai, mumbai news, Ulhasnagar Thane, leopard, leopard Martingale,