Mon, Jul 15, 2019 23:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नफेखोरीसाठी जास्तीच्या स्टेंट टाकल्याने रुग्णांचा मृत्यू

नफेखोरीसाठी जास्तीच्या स्टेंट टाकल्याने रुग्णांचा मृत्यू

Published On: Jun 09 2018 1:57AM | Last Updated: Jun 09 2018 1:47AMमुंबई : दिलीप सपाटे 

ह्दयातील नसामध्ये ब्लॉकेज कमी करण्यासाठी स्टेंटचा वापर करण्यात येत असला तरी रुग्णालये आणि डॉक्टरांनी नफेखोरीसाठी एकापेक्षा जास्त स्टेंट टाकल्यामुळे रुग्णांचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. सरकारी योजनेतून हृदयामध्ये स्टेंट टाकण्यात आलेल्या रूग्णांचा अभ्यास केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

हृदय रूग्णांना त्यांच्या हृदयाच्या नसामध्ये ब्लॉकेज झाल्यास ह्दयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकारने या शस्त्रक्रियेचा समावेश 2012 मध्ये राजीव गांधी आरोग्य विमा योजनेमध्ये केला. या योजनेतून राज्यातील गोरगरीब रुग्णांवर सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याचा खर्च राज्य सरकारकडून देण्यात आला. मात्र, एम्सच्या टीमने केलेल्या अभ्यासात रुग्णांना आवश्यक नसताना जास्तीच्या स्टेंट टाकण्यात आल्याने या शस्त्रक्रिया पुढे त्यांच्या जीवावर बेतल्याचे समोर आले आहे. 

राज्य सरकारकडून शस्त्रक्रियांवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असताना या योजनेचा सर्वसामान्य लोकांना कितपत फायदा झाला याचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागाच्या तत्कालीन सचिव मीता राजीव लोचन यांनी संशोधन करण्याचा निर्णय घेतला होता. या अभ्यासातून आवश्यकता नसतानाही जास्त स्टेंट टाकल्या जात आहेत हे वास्तव समोर आले आहे.या अहवालात रूग्णालयात ह्दयावर शस्त्रक्रिया करताना अमेरिकेप्रमाणे मानांकन सिस्टीम सुरू करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. ब्लॉकेज काढण्यासाठी प्रत्येकवेळा शस्त्रक्रिया किंवा स्टेंट टाकण्याची आवश्यकता नसते.

औषधोपचारानेही रुग्ण बरे होऊ शकतात. मात्र, सर्रासपणे शस्त्रक्रिया आणि स्टेंट टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त स्टेंट टाकले जात आहेत. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचा धोका वाढत असल्याचे डॉ. भानु दुग्गल यांनी सांगितले.  ़हृदयावर उपचार करताना शस्त्रक्रिया करायची असेल तर अशी शस्त्रक्रिया करताना तीन डॉक्टरांची टीम करावी. या तिघांचे मत होत असेल तरच शस्त्रक्रिया करण्यात यावी अशाही सूचना या अभ्यासगटाने केली आहे.  

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, ऋषिकेश येथील 
हृदयरोग विभागाच्या प्रमुख डॉ. भानू दुग्गल यांनी 5 हजार रूग्णांचा अभ्यास करून यासबंधी निष्कर्ष काढले आहेत.

2012 ते 2016 या कालावधीमध्ये शासकीय योजनेतून करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया झालेल्या4 हजार 595 रूग्णांचा अभ्यास केला. त्यासाठी रूग्णांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. 
स राज्यातील सर्व जिल्ह्यातील 110 रूग्णालयातील रूग्णांचा अभ्यास यामध्ये करण्यात आला. यामध्ये एकापेक्षा जास्त स्टेंट टाकलेले अडीचशे पेक्षा जास्त रूग्ण दगावल्याचे समोर आले.