Fri, Apr 26, 2019 17:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावी प्रवेशासाठी यंदा जंगी सामना! 

अकरावी प्रवेशासाठी यंदा जंगी सामना! 

Published On: Jun 09 2018 1:57AM | Last Updated: Jun 09 2018 1:44AMमुंबई : प्रतिनिधी

दहावीच्या निकालात एसएससी बोर्डाच्या तब्बल 33 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना 80 ते 90 दरम्यान मिळालेली टक्केवारी, सीबीएसईतही नव्वद टक्क्यांहून जास्त गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या यामुळे मुंबईतील नामवंत महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशाच्या कटऑफचा सामना मुंबईत जोरात रंगणार आहे. प्रवेशाची पहिली यादी नव्वदीपारच असेल असा दावा प्राचार्यांनी केला आहे.

राज्य मंडळाचा दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मुंबईचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.32 टक्क्यांनी वाढला आहे. 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणार्‍यांची संख्याही तेरा हजारांच्या घरात आहे.  मुंबईतील नामवंत महाविद्यालये पटकावण्यासाठी पहिल्या यादीत एसएससीचे विद्यार्थी विरुद्ध आयसीएसई, सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी अशीच चुरस पाहायला मिळेलच, त्याचबरोबर कटऑफही वाढून अनेक महाविद्यालयांचा गेल्यावर्षीचा 93 टक्केचा उच्चांक मोडण्याची शक्यता आहे.

यंदा सीबीएसईचा दहावीचा निकालाचा टक्का घसरला असला तरी नव्वद टक्क्यांहून जास्त गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यांची चुरस आता एसएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांशी होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांत असलेल्या नामवंत महाविद्यालयातील जागा खेचण्यासाठी चढाओढ होणार आहे.

दहावीपर्यंत सीबीएसईपर्यंतचे शिक्षण घेऊन अकरावी, बारावीसाठी राज्य मंडळातील महाविद्यालयात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे या एसएससी मंडळाच्या परीक्षेत 90 किंवा 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढली की राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांबरोबर अकरावी प्रवेशासाठी चढाओढ वाढते. सीबीएसईच्या चेन्नई विभागात 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या देशात सर्वाधिक 26 हजार 670 इतकी आहे. तर 95 टक्क्यांहून जास्त गुण मिळवणारे विद्यार्थीही याच विभागात सर्वाधिक पाच हजार 737 इतके आहेत. आयसीएसईच्या निकालातही मुंबईकर विद्यार्थ्यांनी     बाजी मारली आहे. त्यामुळे प्राचार्यांनी आताच गेल्यावर्षीच्या तुलनेत नामवंत महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये दोन ते तीन टक्क्यांनीं वाढ होईल असे सांगितले आहे.
 मुंबईतील सेंट झेवियर्स, सोमय्या, रुईया, पोद्दार, रुपारेल, साठ्ये, के. सी., एच. आर., मिठीबाई, कीर्ती आणि हिंदुजा यांसारख्या  नामवंत महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी तिन्हीही मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ यंदाही अटळ असून नव्वदी प्लसचा संघर्ष यंदाही प्रवेशात पहायला मिळणार आहे.

प्राचार्य म्हणतात...
स दरवर्षी विद्यार्थ्यांचा ट्रेंड वेगवेगळा पाहायला मिळतो. यंदा टक्केवारीत वाढ झाल्यामुळे कोणत्या शाखेचा टे्रंड दिसेल हे आता सांगता येणार नाही, विद्यार्थ्यांना गुण जादा मिळाले की मात्र विद्यार्थी तातडीने आपला निर्णय बदलतात, त्यामुळे यंदा महाविद्यालयात अकरावीसाठी चुरस असणारच आहे आणि कटऑफही वाढेल असे रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार देसाई यांनी सांगितले.

स  नव्वद टक्के गुण मिळवणारे हजारांच्या घरात विद्यार्थी आहेत. त्यामुळे यंदा विज्ञान आणि कॉमर्स शाखेचा कल विद्यार्थ्यांचा मोठा असेल आणि नामवंत महाविद्यालय तर नव्वदीच्या खाली पहिल्या यादीत येणारच नाहीत असे मिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांनी सांगितले. गेल्यावर्षी पहिल्या यादीत 90 प्लस विद्यार्थ्यांचे वर्चस्व त्यामुळे 90 टक्क्यांचा आकडा पार केला होता. यंदाही कोट्यातील गुणांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाल्याने यापेक्षा वर जाईल असेही त्यांनी सांगितले.

दुय्यम महाविद्यालये खाणार भाव  
एरव्ही विद्यार्थ्यांच्या पसंतीक्रमावर न दिसणारी दुय्यम महाविद्यालयेही भाव खाणार आहेत.  90 हून अधिक टक्केवारी घेतलेले विद्यार्थी नामवंत महाविद्यालयांतील जागा पटकवणार असल्याने 75 ते 60 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने या विद्यार्थ्यांना दुय्यम दर्जाच्या महाविद्यालयांशिवाय पर्याय नाही. पण विद्यार्थीसंख्या वाढल्याने याच दुय्यम दर्जाच्या महाविद्यालयांमध्येही प्रवेश घेण्यासाठी चुरस होण्याची शक्यता प्राचार्य व्यक्‍त करतात.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक आज
दहावीच्या निकालानंतर पालकांचे लक्ष अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकावर लागले आहे. त्यानुसार उद्या (शनिवारी) किंवा सोमवारी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता शिक्षण उपसंचालक कार्यालयाने वर्तवली आहे.