कल्याणः वार्ताहर
आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंडला मागील काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटना वाढल्या असून दोन दिवसांपासून डम्पिंग परिसरात पसरलेल्या आगीच्या ज्वाळा आणि आजूबाजूच्या परिसरात पसरलेले धुराचे लोट यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.
अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला असला तरी आजही आग धुमसतच आहे. दररोजच्या या जाचाला कंटाळून त्रस्त नागरिकांनी आज रस्त्यावर उतरत लालचौकीजवळ अर्धा तासाहून अधिक काळ रास्ता रोको केला. मुख्य महामार्ग रोखून धरल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अखेर बाजारपेठ पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हटवत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याने पेट घेतला असून कालपासून या आगीचा भडका उडाला आहे. एकीकडे आगीच्या ज्वाळा उसळत असताना या आगीच्या धुराने परिसर व्यापला आहे. या कोंदट धुरामुळे नागरिक घुसमटले असून डोळ्याची जळजळ देखील होत आहे. रात्रभर घरात धूर भरल्यामुळे नागरिकांना घराबाहेर राहावे लागले होते. यामुळे नागरिक त्रस्त असताना आज देखील डम्पिंग ग्राऊंडवर आग धुमसत असून पसरलेल्या धुराचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान या आगीची पाहणी करण्यासाठी आमदार नरेंद्र पवार आणि आयुक्त पी वेलारसू यांनी डम्पिंगचा दौरा केला. यावेळी त्रस्त नागरिकांनी आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता आयुक्तांनी डम्पिंगची आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असले तरी आग पूर्ण पणे विझण्यास तीन ते चार दिवस लागतील असे सांगितले. धुराचा त्रास होऊ नये यासाठी नागरिकांनी चार दिवस हा परिसर रिकामा करावा असा सल्ला दिल्याने संतापलेल्या नागरिकांनी आयुक्त आणि पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ आग्रा रोडवरील लालचौकी येथील मुख्य रस्त्यावरच रास्ता रोको केला. महिलांनी रस्त्यावर ठाण मांडत आम्ही चार दिवस जायचे कुठे आणि राहायचे कुठे असा सवाल केला. तसेच पालिकेच्या चुकीची आम्हाला शिक्षा का असा सवाल केला. आंदोलनकर्त्यांनी तब्बल अर्धा तास रस्ता रोखल्याने रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
मोहिंदर सिग शाळेकडून वाहतूक आधारवाडी चौकातून दुर्गाडीकडे वळविण्यात आली असली तरी रस्त्यावर वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अखेर अर्ध्या तासाने बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना हटवून रस्ता मोकळा केला.