Tue, Apr 23, 2019 09:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘आधारतीर्थ’च्या अंगणात वाजले सनई-चौघडे !

‘आधारतीर्थ’च्या अंगणात वाजले सनई-चौघडे !

Published On: Dec 12 2017 2:07AM | Last Updated: Dec 12 2017 1:06AM

बुकमार्क करा

उल्हासनगर : वार्ताहर

शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्याने कल्याणीच्या वडिलांनी आत्महत्या केली आणि ती नाशिकच्या आधारतीर्थ आधाराश्रमात पोहोचली. शिक्षण घेतले आणि गावी परतली. तिची हुशारी आणि मेहनत घेण्याची क्षमता पाहून स्थळ आले आणि ज्या आश्रमाच्या अंगणात खेळली, बागडली, त्याच आश्रमाच्या अंगणात तिने सौभाग्याचे वाण घेत नवीन जीवनाला सुरुवात केली. 

जळगावच्या चौपडा तालुक्यातील आडवद गावातील पितांबर कानडे यांनी शेतीसाठी घेतलेले कर्ज परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने आत्महत्या केली होती. उत्पन्नाचे साधन नसल्याने कानडे यांच्या पत्नी माया यांनी त्यांची मुलगी कल्याणीला नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आधारतीर्थ आश्रमाकडे सुपूर्द केले. तेव्हा कल्याणी पाचवीत होती. त्यावेळी आश्रमाची परिस्थिती बिकट होती. आश्रमातील इतर अनाथ मुलांबरोबर कल्याणीने महाराष्ट्र दौरा करत दान मिळवत बारावीपर्यंतचे शिक्षण खडतर परिस्थितीत पूर्ण केले. आईला मदत करण्यासाठी आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी नंतर तिने गाव गाठले. 

 काही दिवसांपूर्वी कल्याणी घेत असलेले परिश्रम बघून तिला मेहरूण गावच्या अंबादास या तरुणाचे स्थळ आले. कल्याणीच्या आईने क्षणाचाही विलंब न करता आधारतीर्थ आश्रम गाठत संपूर्ण माहिती आश्रमाचे सर्वेसर्वा त्र्यंबक गायकवाड यांना दिली. मुलगा हा कल्याणी ब्रेक्स कंपनीत चांगल्या पगारावर कामाला असून निर्व्यसनी असल्याची माहिती गायकवाड यांना मिळताच त्यांनी दानशूर व्यक्तींकडून लग्नासाठी साहित्य जमवण्यास सुरुवात केली. वर पक्षाचीही आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आश्रमाच्या अंगणात लग्न मंडप टाकण्यात आला. 

रविवारी पार पडलेल्या या सोहळ्याला निवासी जिल्हाधिकारी रामनाथ घोरपडे, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त जाधव, लार्सन आणि टूरबो कंपनीचे संचालक सुधवार सिंग, तहसीलदार महेंद्र पवार, महंत फरशीवाले बाबा, पोलीस विभागातले अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांना आश्रमातील मुलांनीच बनवलेले जेवण मुलांच्याच हस्ते पंगत बसवून वाढण्यात आले. इतर लग्नांप्रमाणे येथे लहान मुलंच मान्यवरांना आग्रहाने वाढत होती.