Wed, Jul 17, 2019 00:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  मुख्यमंत्री  आले, थांबले आणि आश्‍वासन देऊन निघून गेले

 मुख्यमंत्री  आले, थांबले आणि आश्‍वासन देऊन निघून गेले

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 12:54AM

बुकमार्क करा


उल्हासनगर : नवनीत बर्‍हाटे

आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या अनाथ मुलांच्या आधारतीर्थ आधारश्रमातील सभागृहाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. मात्र गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला गेल्यामुळे उशीर झाला. यामुळे नियोजित कार्यक्रम वगळून पुढे जाणार्‍या ताफ्याला आश्रमाच्या मुलांनी आर्त हाक देत थांबवले. तसेच रस्त्यावरच सत्कार समारंभ पार पाडत मागील पाच वर्षांपासून प्रलंबित आश्रमाशाळेच्या आश्वासनाची आठवण करून दिली.

त्र्यंबकेश्वरमधील तुपादेवी रस्त्यावर आत्महत्या केलेल्या 200 पेक्षा अधिक शेतकर्‍यांच्या मुलांचे आधारतीर्थ आधार आश्रमात वास्तव्य आहे. या आधार आश्रमात मुलांसाठी एक सभागृह बांधण्यात आले आहे. या सभागृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते सोमवारी दुपारी दीड वाजता पार पडणार होते. यासाठी आश्रमाचे त्र्यंबक गायकवाड यांनी रितसर वेळही घेतली होती. तेथून ते त्र्यंबकेश्वर येथे निवृत्ती महाराज मंदिराच्या भूमिपूजनाला जाणार होते. या कार्यक्रमासाठी आश्रमात जोरदार तयारी केली होती. मात्र गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला जावे लागल्याने अनेक कार्यक्रम वगळण्यात आले. याची माहिती आश्रमातील मान्यवरांना मिळताच मागील तीन वर्षांपासून आश्रमशाळेला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली नाही, आणि आताही त्यांच्याकडे वेळही नाही, असा नाराजीचा सूर सुरू झाला. आश्रमाचे सर्वेसर्वा त्र्यंबक गायकवाड, उल्हासनगर शिवसेना विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, स्वामी शिवरुपानंद, ह.भ.प. एकनाथ महाराज, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी राजकीय व्यक्तींशी संपर्क साधत मुख्यमंत्र्यांना विनविण्याचा प्रयत्न सुरू केला.

मात्र त्याला यश मिळत नसल्याने आश्रमातील मुले रस्त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना काढलेल्या संघर्ष यात्रेत आघाडीवर राहत आश्रमातील मुलांनी साथ दिली होती. मात्र सत्तेवर आल्यावर आम्हाला विसरले, साधी आश्रमशाळाही दिली नाही. यामुळे चिडलेली बालके आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती पत्रकारांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहचवली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फक्त रस्त्यावर भेट घेणार असल्याचे सांगितले. त्यानुसार मंगळवारी दुपारी 3 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा आश्रमासमोर काही मिनिटांसाठी थांबला. यावेळी आश्रमातील मुलगा अशोक पाटील याने आश्रमाशाळेच्या मागणीची आठवण करून दिली. तेव्हा तुमची मागणी लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला. 
अखेर ग्रामविकास मंत्र्यांनी केले उद्घाटन

मुख्यमंत्र्यांचा ताफा निघून गेल्यावर ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांना धनंजय बोडारे यांनी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत दादासाहेब भुसे यांनी उद्घाटन केले. तसेच प्रलंबित आश्रमाशाळा लवकरात लवकर देऊ, असे आश्वासन दिले.