Mon, Jul 13, 2020 23:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शारीरिक सुखाची मागणी करून अभिनेत्रीला मानसिक त्रास

शारीरिक सुखाची मागणी करून अभिनेत्रीला मानसिक त्रास

Published On: Jun 13 2019 1:35AM | Last Updated: Jun 13 2019 12:31AM
मुंबई : प्रतिनिधी 

एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका 33 वर्षांच्या विवाहित अभिनेत्रीकडे शारीरिक सुखाची मागणी करताना अश्‍लील मॅसेज आणि व्हिडीओ पाठवून तिला मानसिक त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्‍वरी परिसरात उघडकीस आला. या अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. मोबाईल क्रमांकावरुन या आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पवईतील हिरानंदानी गार्डन परिसरात तक्रारदार अभिनेत्री तिच्या पतीसोबत राहत असून तिने काही सिनेमांमध्ये काम केले आहे. सिनेजगताशी संबंधित असल्याने तिचा मोबाईल क्रमांक तिच्या परिचित लोकांकडे आहे. ऑक्टोबर 2018 रोजी तिला एका मोबाईल क्रमांकावरुन फोन आला होता. या व्यक्तीने तिला एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम देत असून त्या कामाचे तिला पाच कोटी रुपये मिळतील, असे सांगितले. मात्र ते काम मिळवण्यासाठी त्याने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. त्याची ही मागणी ऐकून तिला धक्काच बसला, मात्र तो मनोरुग्ण व्यक्ती असावा म्हणून तिने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तो तिला सतत अश्‍लील मॅसेज आणि व्हिडीओ पाठवून त्रास देऊ लागला. 

वेगवेगळ्या मोबाईलवरुन बोलताना त्यांना दोन अज्ञात व्यक्तींकडून त्यांना कॉल केले जात असल्याचे उघडकीस आले. या दोघांनीही त्यांचे नाव राहुल गोयल आणि राहुल चौधरी असल्याचे समजले होते. त्यापैकी राहुल गोयलने तिला फोन करताना शारीरिक संबंध ठेवले नाही तर तिला सिनेमात काम करू देणार नाही अशी धमकीच दिली होती. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून हा प्रकार असाच सुरू होता. मात्र तिने याबाबत कोणालाही सांगितले नाही. अनेकदा तिने संबंधित क्रमांक ब्लॉक केले, मात्र ते दोघेही दुसर्‍या मोबाईलवरुन तिला अश्‍लील मॅसेज आणि व्हिडीओ पाठवून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव ठेवत होते. नेहमीच्या त्रासाला कंटाळून तिने मंगळवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली.  या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला.