Mon, May 20, 2019 18:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘त्या’ आरोपींचा दाभोलकर, पानसरे हत्येशी संबंध तपासणार

‘त्या’ आरोपींचा दाभोलकर, पानसरे हत्येशी संबंध तपासणार

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 1:21AMमुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा येथून दोन आणि पुण्यातून एक अशा तीन व्यक्‍तींना गावठी बॉम्ब व स्फोटके हाताळत असल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या या तीनही व्यक्‍तींचा महाराष्ट्रात यापूर्वी घडलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्यांशी काही संबंध आहे का? हे देखील तपासून पाहण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

एटीएसने अटक केलेला वैभव राऊत हा सनातन या संस्थेशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात गृहविभागाकडे नेमकी काय माहिती उपलब्ध आहे, खबरदारीची उपाययोजना म्हणून सरकारकडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? असा प्रश्‍न पत्रकारांनी केला असता, तपासयंत्रणेने अद्याप कोणत्याही संस्थेचे नाव घेतलेले नाही. अटक करण्यात आलेल्या या व्यक्‍ती कुणाच्या संपर्कात होत्या, त्या कुणासाठी काम करत होत्या, त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके आली कोठून याबाबत चौकशी पूर्ण झाल्यावर संबंधित तपास यंत्रणेकडून माहिती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात सनातन या संस्थेचा संबंध असेल, तर त्यांच्यावर कोणती कारवाई करायची, याचा निर्णय गृहविभागाकडून घेतला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.