Wed, Jun 26, 2019 11:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे प्रमाण १५ टक्क्यांनी वाढले

मुंंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे प्रमाण १५ टक्क्यांनी वाढले

Published On: Apr 22 2018 8:08AM | Last Updated: Apr 22 2018 1:25AMमुंबई : प्रतिनिधी

शहरातील लहान मुलींच्या अपहरण आणि बेपत्ता होण्यामध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून गेल्या पाच वर्षात हे प्रमाण तब्बल 15 पटीने वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2013 साली अपहरण झालेल्या मुलींची संख्या 92 होती. ती 2017 अखेरपर्यंत तब्बल 1 हजार 368 पर्यंत पोहोचली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना माहिती अधिकाराखाली मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत शहरातून तब्बल 5 हजार 56 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांना 4 हजार 758 मुलींचा शोध घेण्यात यश आले. मात्र 298 लहान मुलींचा अद्याप शोध न लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तर गेल्या पाच वर्षांत शहरातून तब्बल 3 हजार 390 अल्पवयीन मुले गायब झाली. त्यातील 3 हजार 134 मुले सापडली असून 256 मुलांचा थांगपत्ता लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

लहान मुली आणि मुलांचे अपहरण होण्याचा गंभीर प्रश्‍न पोलिसांसमोर असताना 2013 ते 2017 या पाच वर्षात शहरातून 2 हजार 839 महीला बेपत्ता झाल्या असून 530 जणींचा शोध पोलीस घेऊ शकले नाहीत. तर 6 हजार 510 वयस्कर पुरुष बेपत्ता झाले असून 1 हजार 196 बेपत्तांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. अल्पवयीन मुली, मुले आणि महिलांच्या गायब होण्यामागे मानवी तस्करी करणार्‍या टोळ्यांचा हात आहे का? याचा शोध घेऊन ठोस कारवाई करण्याची मागणी शेख यांनी एका लेखी अर्जाद्वारे पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्याकडे केली आहे.

Tags : Mumbai,  minor girls, abduction, 15 percent,  increased, Mumbai news,