Sun, Mar 24, 2019 23:09
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मानेवर किडा पडलाय; भामट्यांचा नवा फंडा

मानेवर किडा पडलाय; भामट्यांचा नवा फंडा

Published On: Feb 19 2018 11:05AM | Last Updated: Feb 19 2018 11:04AMठाणे : प्रतिनिधी

बँकातून पैसे काढून बाहेर पडलेल्या नागरिकांवर करडी नजर ठेवत त्यांना लुटण्याची अनोखी पद्धत चोरांनी शोधून काढली आहे. मानेवर किडा पडल्याचे सांगत बोलण्यात गुंतवून  चोरटे पैसे लंपास करू लागले आहेत. अशी एक घटना कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यापूर्वी अशाचप्रकारे कल्याणमध्येही एकाला 1 लाख रूपयांना हिसका देण्यात आला होता.

अमोल सिंग (43, रा. भाईंदर पाडा, घोडबंदर रोड) शनिवारी दुपारी कासारवडवली सिग्नलजवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी सिंग यांना मानेवर किडा  पडला आहे, असे सांगितले. दोघांनी सिंग यांना जवळच्या हॉटेलमध्ये नेत त्यांच्या हातात पाण्याचा मग मान धुण्यासाठी दिला. मान धुण्यासाठी सिंग यांनी हातातील बॅग बाजूला ठेवली.  हीच संधी साधत दोघा भामट्यांनी सिंग यांची बॅग उचलून दुचाकीवरून पळ काढला. या बॅगेत 1 लाख 10 हजाराची रोकड व दस्तावेज होते. याप्रकरणी  कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यापूर्वी शुक्रवारी कल्याण पश्मि योगिधाम परिसरातील जॉन तोफिल (50) हे सकाळी बँकेतून एक लाखांची रक्कम काढून घराकडे परतत होते. जॉन बँकेबाहेर उभ्या केलेल्या 
दुचाकीजवळ पोहचले असता एका अनोळखीने त्यांना हटकले. तुमच्या गळ्यावर किडा असल्याचे त्याने सांगितले. जॉन यांनी रोकड असलेली पिशवी दुचाकीला अडकवून शर्ट  झटकण्यास सुरुवात केली. याच संधीचा फायदा घेत  भामट्याने जॉन यांची पिशवी हिसकावून तेथून पळ काढला होता.