Tue, Jul 14, 2020 14:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विखे, क्षीरसागर, महातेकरांचे मंत्रिपद धोक्यात?

विखे, क्षीरसागर, महातेकरांचे मंत्रिपद धोक्यात?

Published On: Jun 18 2019 1:03PM | Last Updated: Jun 18 2019 1:03PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळाचा गेल्या रविवारी विस्तार झाला. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले जयदत्त क्षीरसागर आणि रिपांइचे नेते अविनाश महातेकर यांचा  मंत्रिमंडळात समावेश झाला. मात्र ही दिलेली मंत्रिपदे घटनाविरोधी असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुरिंदर अरोरा, संजय काळे आणि संदीप कुलकर्णी या सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. 

राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नाही. तरीही या तिन्ही नियुक्त्या का केल्या? याचे उत्तर सरकारने द्यावे, असा प्रश्न त्यांनी याचिकेतून उपस्थित केला आहे. हा निर्णय घटनाबाह्य व बेकायदा असल्याने तो रद्द करण्यात यावा, असे याचिकादाराने याचिकेतून निदर्शनास आणून दिले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील व जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबदल केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सोडल्यास राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टातील तरतुदीप्रमाणे संबंधित सदस्याला अपात्र घोषित करणे आवश्यक आहे. या दोघांना अपात्र घोषिक करण्याविषयी सभापतींना निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेतून केली आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रिपद दिले. त्यानंतर काल सोमवारपासून विधिमंडळ अधिवेशन सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची सभागृहात ओळख करून दिली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आक्षेप नोंदवत कोणत्याही सभागृहाचे सदस्यत्व नसताना मंत्रिपदाची शपथविधी घेता येत नसल्याचे म्हटले. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा हा मुद्दा गैरलागू असल्याचे सांगितले.