Sun, Jun 16, 2019 12:46
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्हा परिषदेवर भगवे राज!

ठाणे जिल्हा परिषदेवर भगवे राज!

Published On: Jan 16 2018 2:13AM | Last Updated: Jan 16 2018 12:37AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी 

ठाणे जिल्हा परिषदेच्या इतिहासाचे भगवेकर करण्यास शिवसेना यशस्वी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन पहिल्यांदाच जिल्हा परिषद अध्यक्षपदावर कब्जा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करून शिवसेनेेने भाजपचा उधळणारा वारू रोखला आणि राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे  यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे मनसुबे माजी आमदार गोटीराम पवार यांच्यामुळे फसल्याने भाजपने ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली आणि शिवसेनेच्या मंजुषा जाधव या अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीचे सुभाष पवार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

ठाणे जिल्हा विभाजनानंतर झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने 53 पैकी 26 जागांवर विजयी पताका फडकवली होती. परंतु भिवंडीतील एका जागेवर भाजपचा उमेदवार विजयी झाला आणि भाजप अपक्ष उमेदवार आणि काँग्रेसच्या सदस्यांना गळाला लावण्यास भाजपच्या नेत्यांना यश आले. त्यात पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीसह काँग्रेसशी युती करत नव्या समिकरणांना जन्म दिला. तर शिवसेनेने आवश्यकता नसतानाही शहापूरमध्ये उपसभापतीपद राष्ट्रवादीला बहाल करून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेडपी अध्यक्षपदाच्या समिकरणाचे संकेत दिले होते. त्यावेळी शहापूरमधील शिवसैनिकांची नाराजीही सेना नेत्यांनी ओढवून घेतली. पंचायत समितीमधील या गणिताचा फायदा शिवसेनेला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झाल्याचे दिसून आले. 

बहुमताचा जादुई 27 हा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेला एका मताची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांना राष्ट्रवादीला उपाध्यक्षपदासह सभापतीपद बहाल करावे लागले.  निवडणुकीपूर्वीच शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसची यांची झालेली युती ही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यास यशस्वी झाली आहे. त्यामुळे खा. कपिल पाटील यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे जाऊनही पदरात काही पडले नाही. पालकमंत्री शिंदे यांची रणनिती उपयुक्त ठरली आणि राष्ट्रवादीला उपाध्यपद बहाल करण्यात आले. त्यासाठी माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपूत्र सुभाष पवार यांची अचूकपणे केलेली निवड ही भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फिरण्यास कारणीभूत ठरली. अखेर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला माघार घ्यावी लागली आणि विरोधी बाकावर बसावे लागले. 

सोमवारी सकाळी अकरा वाजता सेना नेत्यांनी अध्यक्षपदासाठी शहापूरमधील सदस्या  मंजुषा जाधव आणि राष्ट्रवादीचे मुरबाडमधील सदस्य सुभाष पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. तर भाजपकडून शहापूरमधील नंदा उघडा आणि अपक्ष सदस्य अशोक घरत यांचे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. दुपारी तीन वाजता सभा सुरू झाली आणि निवडणूक पीठासीन अधिकारी सुदाम परदेशी यांनी  माघार  घेण्यासाठी 10 मिनिटांची अवधी दिला आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारी माघार घेतली. पीठासीन अधिकार्‍यांनी अध्यक्षपदी जाधव आणि उपाध्यपदी पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आणि सभागृहाबाहेर घोषणाबाजी, फटाक्यांची आतिषबाजी झाली. या ऐतिहासिक विजयानंतर टेंभीनाक्यावरील आनंदाश्रम आणि समाधीस्थळी जावून दिवंगत आनंद दिघे यांना श्रद्धांजली अर्पण करून विजयी मिरवणूक काढण्यात आली. तसेच राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याऐवजी शिवसेनेला टाळी देऊन शिवसेना-राष्ट्रवादीच्या मैत्रिचे प्रतिक बनलेले दिवंगत वसंत डावखरे यांनाही एकाप्रकारे ही श्रद्धांजली वाहली.