होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पळपुट्या झाकीरला न्यायालयाने फटकारले

पळपुट्या झाकीरला न्यायालयाने फटकारले

Published On: Apr 10 2018 1:21AM | Last Updated: Apr 10 2018 1:14AMमुंबई : प्रतिनिधी

गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासयंत्रणेला सामोरे न जाता मलेशियात लपून बसलेला पळपुटा झाकीर नाईक आपल्या विरोधातील गुन्ह्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी याचिकाच कशी काय  करू शकतो, असा संतप्त सवाल न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने उपस्थित करून वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा अध्यक्ष झाकीर नाईकच्या याचिकेचा चांगलाच समाचार घेतला. अशा याचिकेला न्यायालयात थारा नाही. न्यायालय अशी याचिका ऐकूच शकत नाही, असेही बजावून याचिका फेटाळण्याचे संकेत दिले.  

मुस्लिम तरुणांना दहशतवादी कृत्य करण्यासाठी प्रेरणा देणारा वादग्रस्त इस्लामी धर्मगुरू झाकीर नाईकच्या विरोधात गुन्हा दाखल करून राष्ट्रीय तपासयंत्रणेने (एनआयए) तसेच ईडीमार्फत चौकशी सुरू केली. चौकशीला सामोरे न जाता नाईकने मलेशियामध्ये पलायन केले. न्यायालयानेही त्याला फरार घोषित केले. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जबाब नोंदवून आरोपपत्र दाखल करण्याचे तपास यंत्रणांना देण्याची विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर सुनावणी झाली.  

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तसेच ईडी आणी राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड. जितेद्र वेणेगांवकर अ‍ॅड. संदेश पाटील आणि अ‍ॅड. अरुणा कामत-पै यांनी जोरदार विरोध केला. तपास यंत्रणेेला सहकार्य करण्याऐवजी नाईक मलेशिया येथे पळून गेला आहे. असे असताना त्याचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जबाब घेताच येणार नाही. त्याला तपास यंत्रणेसमोर यावेच लागेल अशी भूमिका घेतली.न्यायालयानेही ती मान्य केली. 

Tags : Mumbai, Mumbai news,  Zakir Naik, Charge sheet issue ,