होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्लॉग : झायरा बोलली, तुम्ही शांत का?

ब्लॉग : झायरा बोलली, तुम्ही शांत का?

Published On: Dec 11 2017 4:17PM | Last Updated: Dec 11 2017 4:47PM

बुकमार्क करा

पूजा कदम : पुढारी ऑनलाईन  

‘धाकड गर्ल’ झायरा वसिमसोबत नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला. विमान प्रवासादरम्यान एका सहप्रवाशाने असभ्य वर्तन करत तिची छेड काढली. ती विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाने दिल्लीहून मुंबईला येत होती. विमानात झायराच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने असभ्य वर्तन केले. विशेष म्हणजे या प्रकाराची  तक्रार विमानातील कर्मचाऱ्यांकडे केल्यानंतरही कुणीही मदतीला आले नाही. छेड काढणाऱ्या व्यक्तीने त्याचा पाय खांद्याला लागेल इतका वरती ठेवला होता. सुरूवातीला झायराने त्याकडे दुर्लक्ष केले पण नंतर मात्र त्या व्यक्तीने हद्दच पार केली. विमानातील लाईट बंद झाल्यानंतर त्या व्यक्तीने झायराच्या पाठीला व मानेला पायानेच स्पर्श करायला सुरूवात केल्याचा आरोप करत त्याची तक्रार संबंधीत विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे केली पण, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. समाजात अनेक मुली, महिलांना दररोज अशा प्रकारांना सामोरे जावे लागते मात्र समाजाच्या भितीने त्या गप्प बसतात.

समाज काय म्हणेल या भितीने जर झायरासुद्धा इतरांसारखी गप्प बसली असती तर तिच्यासोबत घडलेला हा प्रकार कधीच उघडकीस आला नसता. पण, या प्रकाराला वाचा फोडण्याचे धाडस १७ वर्षीय झायराने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले. झायराने विमानातच ‘इन्स्टाग्राम लाईव्ह’ करण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. म्हणून झायराने त्या व्यक्तीचा फोटो टिपण्याचा प्रयत्न केला. पण फोटोत फक्त त्या व्यक्तीचा पायच दिसत होता. अखेर शांत राहून झायराने तो प्रकार सहन केला आणि विमानतळावर उतरताच झायराने रडतच तिचा विमानप्रवासाचा ‘तो’ अनुभव ‘इन्स्टाग्राम लाईव्ह’च्या माध्यमातून शेअर केला.

काही दिवसांपूर्वी #MeToo हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता. हॉलिवूड अभिनेत्री रोझ मॅकगोवॅनने हॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता हार्वी वाइन्स्टाइन याच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. १९९०च्या दशकात हार्वीने बलात्कार केल्याची आपबिती रोझने ट्विटरवर शेअर केली होती. त्यानंतर ‘हा’ मजकूर आक्षेपार्ह आहे, असे सांगत ट्विटरने तिचे अकाऊंट बंद केले होते. यानंतर तिने ट्विटरचे स्क्रिनशॉट इन्स्टाग्रावर शेअर केले होते. यानंतर जगभरातील अनेक महिलांनी ट्विटरवरच बहिष्कार टाकला होता. 

रोझने केलेले आरोप हार्वीने धुडकावून लावले. पण त्यानंतर हॉलिवूडमधील २५ अभिनेत्रींनी हार्वीवर लैंगिक आत्याचार केल्याचे आरोप केले. हार्वीची ‘ऑस्कर’च्या कमिटीमधून हकालपट्टी करण्यात आली. #Womenboycott पासून सुरू झालेले वादळ #MeToo पर्यंत पोहचले. #MeToo हा हॅशटॅग वापरत जगभरातील अनेक महिलांनी त्यांच्यासोबत झाले अत्याचार, हिंसाचार आणि लैगिंक शोषणाच्या प्रकारांना वाचा फोडली. यामध्ये हॉलिवूडसह बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांचाही समावेश होता.

झायराचा अनुभव ऐकून अनेकांच्या अंगावर शहारे तर आलेच पण, अनेकांनी  या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यास सुरूवात केली. विश्वसुंदरी मनुषी छिल्लर, मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे, हरियाणाची कुस्तीपटु बबिता फोगट यांनी  तिला पाठिंबा दिला. झायरा व्यक्त झाली आणि तिला तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी माध्यम म्हणून सोशल मीडिया विश्वासार्ह वाटला. जो विश्वास व्यक्तीकडून अथवा यंत्रणेकडून मिळायला हवा होता तो आता या माध्यमातून मिळतोय. यातून ठळकपणे समोर आलेली गोष्ट म्हणजे महिलांना माध्यम मिळाले आहे आता गरज आहे ती व्यक्त होण्याची...जशी हिंम्मत झायराने दाखवली तशी तुम्ही दाखवणार?