होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लघुशंका करताना हटकल्याने तरुणाची हत्या

लघुशंका करताना हटकल्याने तरुणाची हत्या

Published On: Aug 28 2018 1:55AM | Last Updated: Aug 28 2018 12:56AMउल्हासनगर : वार्ताहर

रस्त्यावरील बोळीमध्ये लघुशंका करताना हटकल्याने त्याचा राग मनात धरून तीन जणांच्या टोळीने तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. चंद्रकांत मोरे (29) असे या मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी टक्का ऊर्फ रवी जैस्वार याला अटक केली आहे. तर फरार दोघांचा शोध सुरु केला आहे. 

उल्हासनगर कॅम्प 2 येथील खेमाणी परिसरात कारा हॉलजवळ सेल्समन चंद्रकांत मोरे राहतो. रविवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रकांत हा त्याच्या मित्रासोबत मच्छीमार्केट परिसरात उभा असताना त्याठिकाणी नितीन चौधरी हा गल्लीतील बोळीमध्ये लघुशंका करीत होता. चंद्रकांतने त्याला येथे लघुशंका का करतो? याबाबत हटकले. त्यावरून चंद्रकांतचा नितीन व त्याचे मित्र सुनील प्रजापती, टक्का ऊर्फ रवी जैस्वार याच्यासोबत वाद झाला. त्याचा राग त्या तिघांना आला होता. 

या घटनेची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पालवे, पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांना मिळताच त्यांनी घटना घडलेल्या ठिकाणी धाव घेत पंचनामा केला. या घटनेप्रकरणी मुकेश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उल्हासगर पोलीस ठाण्यात सुनिल, नितीन व रवि या तिघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळालेल्या तीन जणांना शोधून काढण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे ए. एस. आय. गायकवाड, पोलीस नाईक मिलींद बोरसे, पो. कॉ. अर्जुन मुत्तलगिरी यांनी काही तासातच तिघांपैकी रवी जैस्वार याला हनुमानगर परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर त्याच्या इतर दोन सहकार्‍यांचा शोध पोलीस घेत आहेत.