होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उत्तर प्रदेशातून आणलेल्या घातक शस्त्रांसह तरुणास अटक

उत्तर प्रदेशातून आणलेल्या घातक शस्त्रांसह तरुणास अटक

Published On: Feb 05 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 12:59AMमुंबई : प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातून आणलेल्या घातक शस्त्रांसह एका आरोपीस शनिवारी नेहरुनगर पोलिसांनी अटक केली. किसन केवत असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी पाच गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. किसन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध 22 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशातून काही आरोपी घातक शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती नेहरुनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने शनिवारी कुर्ला लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनस स्थानकात साध्या वेशात पाळत ठेवली. शनिवारी किसन हा उत्तर प्रदेशातून गोदाम एक्सप्रेसने आला होता. यावेळी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडील सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात पोलिसांना पाच गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतुसे सापडली. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला येथील लोकल कोर्टाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. किसन हा मूळचा उत्तर प्रदेशच्या आझमगढचा रहिवाशी आहे. सध्या तो कळवा परिसरात राहतो. गावठी कट्टे विकून त्याला जास्त पैसे कमवायचे होते, मात्र त्याचा हा प्रयत्न फसला आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या किसनविरुद्ध पंतनगर, चेंबूर, माहीम, गोवंडी, देवनार, शिवाजीपार्क, पार्कसाईट, सायन व जोगेश्‍वरी पोलीस ठाण्यात 22 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.